Raj Thackeray : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची मोठी घोषणा, खेडच्या सभेतून एल्गार

| Updated on: Jul 13, 2023 | 8:13 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच येत्या निवडणुकीत कशी रणनिती असेल याबाबतही कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.

Raj Thackeray : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची मोठी घोषणा, खेडच्या सभेतून एल्गार
राज्याच्या राजकारणावर थेट भाष्य करत राज ठाकरे यांचा निर्धार, निवडणुकीबाबत स्पष्टच सांगितलं की...
Follow us on

रत्नागिरी : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात बरीच उलथापालथ झाली आहे. राजकारण इतक्या वेगाने बदललं आहे की कोण कोणासोबत याचा अंदाज बांधणं कठीण आहे. या राजकीय चिखलफेकीत आजही राज ठाकरे आपली स्वतंत्र अशी चूल मांडून आहेत. कोणासोबत युती नाही की आघाडी नाही एकला चलो रे असा नारा घेऊन पुढे चालले आहेत. पण सध्याची राजकीय स्थिती पाहता भूमिका घेणं महत्त्वाचं आहे, असंच राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यातून अर्थ काढला जात आहे. राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच पुढच्या वाटचालीबाबत संकेत देऊन टाकले. खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश देऊन कामाला लागण्यास सांगितलं.

“मागच्या वेळी ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. आता नगरपरिषदेच्या ज्या निवडणुका लढवायच्या आहेत. या आपल्याला स्वबळावर लढवायच्या आहेत.कोणालाही बरोबर घेऊन लढवायच्या नाहीत. कोणाशीही युती नको आणि काही भानगडीच नको. खेडमध्ये जेव्हा आपण स्वबळावर निवडणुका लढवू तेव्हा निश्चित आपल्याला यश मिळेल.”, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

दुसरीकडे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सध्याच्या राजकीय चित्रावरही भाष्य केलं. ” मला आता बघायचं आहे की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता त्यांचा राग व्यक्त करते का? की पुन्हा एकदा यांच्या पैशांच्या तमाशावर विकले जातात का? त्याच त्याच गोष्टी जर अशाप्रकारे होत असतील तुम्हीही फक्त मतदान करत बसत असाल. तर या सर्व राजकारणाला आणि निवडणुकांना काही अर्थ उरणार नाही.”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“कशासाठी निवडणुका लढवायच्या आणि उमेदवार उभे करायचे. महाराष्ट्रात जे काही चालू आहे त्यात जनतेला आनंद मिळत असेल तर मग भोगा.येणाऱ्या पिढ्यांना हा जो सर्व चिखल केला आहे त्यात घालायचं आहे की नवनिर्माण करायचं आहे हा विचार जनतेनं करणं गरजेचं आहे.”, असंही राज ठाकरे यांनी पुढे सांगितलं.