सातारा : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) जनआंदोलन उभे केले होते.महावितरणमध्ये वीज वितरण करताना वर्षाला 25 ते 30 हजार कोटींचा घोटाळा होत आहे. हा सर्व घोटाळा बाहेर काढणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे. येत्या 15 दिवसात महावितरणने (Mahadiscom) योग्य निर्णय घेऊन दिवसा शेतकऱ्यांसाठी वीज उपलब्ध न केल्यास संपूर्ण राज्यात जाऊन व्यापक जनआंदोलन उभे करून या सरकारला गुडघे टेकायला लावणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी महावितरण सोबत शेतकऱ्याला दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी बैठक घेतली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
उन्हाळ्यामध्ये वीजेची मागणी वाढायला लागली आहे. या काळात वीजेची मागणी 23 हजार मेगावॅट पर्यंत जाते. हा लोड समान विभागला जायला हवा त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना दिवसा वीज देत नाही, असं अधिकारी म्हणाल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. 23 हजार मेगावॅटमध्ये शेतकऱ्याची वीज पाच हजार सहाशे मेगावॅट आहे. तर, मग आम्हाला ही वीज का मिळू दिली जात नाही. महानिर्मितीची वीज निर्मिती क्षमता दहा हजार मेगावॅट निर्मिती क्षमता आहे. मात्र, 6500 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. एनटीपीसीकडून काही वीज खरेदी केली जाते. खासगी जलविद्युत प्रकल्प, पवनचक्की आणि सौर उर्जा याद्वारे वीज उपलब्ध केली जाते. यानंतर, प्राईम टाईमला 10 हजार मेगावॅट वीज घेतली जाते. ही वीज खरेदी करताना महाराष्ट्राच्या जनतेला फसवलं जातंय. पीक आवरला ओपन मार्केटमधून 21 रुपये 29 पैशानं वीज खरेदी केली जाते. तर, पीक आवर नसतान 1 रुपये 68 पैशानं वीज खरेदी केली जाते. पीक आवरला वीज खरेदीकरुन शेतकऱ्याच्या माथी महागडी वीज मारली जात आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
मध्यरात्री आणि दुपारी ज्या काळात कुणी वीज घेत नसतं त्यावेळी ओपन मार्केटमधून वीज घ्यायची आणि शेतकऱ्यांच्या माथी मारायची. शेतकऱ्यांच्या वीजेचा एका युनिटचा खर्च 3 रुपयाच्यावर जातो. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरानं वीज देतो असं सांगितलं जातं. म्हणजे 1 रुपये 68 पैशानं वीज घेता. शेतकऱ्यांना 3 रुपयांना वीज देता. आणि त्याचा अधिभार उद्योगांवर टाकता हा ढोंगीपणा आहे, असं राजू शेट्टी म्हणाले. खासगी जलविद्युत प्रकल्पात तयार झालेली वीज 21 रुपये यूनिटनं खरेदी करायची. हा जवळपास 20 ते 25 हजार कोटींचा घोटाळा जर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली नाही तर बाहेर काढू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
पहाटे 4 ते 12, 6 ते 2, 1 ते 9, 3 ते 11 या वेळांमध्ये आम्हाला लाईट द्या. मात्र, रात्री 11 ते पहाटे 4 या कालावधीत आम्हाला वीज नको. आमचा प्रस्ताव मांडल्यावर 15 दिवसात तज्ज्ञ कमिटी नेमतो आणि यासंदर्भात निर्णय घेतो, असं उर्जा मंत्र्यांनी सांगितलं. आम्ही सरकारवर 100 टक्के विश्वास ठेवलेला नाही. त्यामुळं महाराष्ट्रात जनजागृती करायची, जर सरकारनं फसवलं तर जन आंदोनल करुन शेतकऱ्याला दिवसा वीज मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी म्हणाले.
इतर बातम्या:
अर्थमंत्री कसा असावा? उद्धव ठाकरे यांचा जुना व्हिडिओ व्हायरल