शिवसेनाप्रमुखांचा आत्मा तडफडत असेल, उद्धव ठाकरे यांना शाप देत असतील; रामदास कदम यांचा घणाघात

| Updated on: Mar 27, 2023 | 1:36 PM

माझ्याकडची माहिती मी बाहेर काढेन. एवढी घाई कशाला. मीच काय अनेक लोक माहिती बाहेर काढतील. काल सुहास कांदे यांनी सुरुवात केली आहे. थोडे दिवस थांबा, सर्व काही बाहेर येईल, असा इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे.

शिवसेनाप्रमुखांचा आत्मा तडफडत असेल, उद्धव ठाकरे यांना शाप देत असतील; रामदास कदम यांचा घणाघात
ramdas kadam
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रत्नागिरी : सावरकरांबाबत एवढा स्वाभिमान असेल तर काँग्रेस सोडा. फक्त नसते इशारे का देता? हिंमत असेल तर व्हा बाजूला. बाळासाहेबांचे सुपुत्र आहात ना? मग घ्या निर्णय. पण ते होणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी संपली होती. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि या दोघांना जीवदान मिळालं. काँग्रेस पुन्हा जिवंत केली. शिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. त्यांचा आत्मा तडफडत असेल वर. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना शाप देत असतील, असा संताप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला. ते टीव्ही9 मराठीशी बोलत होते.

रामदास कदम यांनी कालच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून जोरदार हल्ला केला. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्याने ते दुखावले गेले आहेत. ज्यांनी मुख्यमंत्रीपद घालवलं त्या 40 आमदारांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे. गद्दार कोण याचा फैसला महाराष्ट्र करेल. आपल्या बापाच्या विचाराशी गद्दारी करणारे इतिरांना गद्दार कसे म्हणू शकतात? बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार त्यांना आहे का? गद्दारीचा शिक्का तुमच्या कपाळावरून जाणार नाही. कितीही भाड्याने लोकं आणून बोंबलला तरी तुमच्या कपाळावरील गद्दारीचा शिक्का जाणार नाही, असं रामदास कदम म्हणाले.

हे सुद्धा वाचा

भगव्याचा अधिकार आम्हालाच

भगवा झेंडा हातात घेण्याचा नैतिक अधिकार आम्हाला आहे. भगव्याचे शिपाई आम्ही आहोत. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन मुख्यमंत्री बनलात. त्या दिवशी तुम्ही भगव्याचा अधिकार गमावलाय. धनुष्यबाणाचा अधिकार गमावलाय. शिवसेनेचा अधिकार गमावलाय. तुम्ही कितीही उसनं अवसान आणून बोलला तरी तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

हिंमत असेल तर आव्हान स्वीकारा

आता खोके बाहेर येतील. काल सुहास कांदेंनी दोन कंत्राटदारांची नावे सांगितली. या कंत्राटदारांकडून उद्धव ठाकरे यांनी खोके घेतल्याचं सांगितलं. नार्को टेस्ट करण्याचं आव्हान दिलं. तुम्ही आव्हान का नाही स्वीकारलं? बाळासाहेब गेल्यावर तुम्ही हुकूमशाह झाला. तुम्ही मिठाईचं दुकान थाटलं अन् आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करता? हिंमत असेल हिंमत असेल असं तुम्हीच म्हणत होता ना. मग स्वीकारा कांदे यांचं आव्हान?; असं आव्हानच कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

राष्ट्रवादीची सुपारी घेतली

संजय राऊतांवर मला बोलायचं नाही. त्यांच्या बोलण्याला कोणी किंमत देत नाही. ते निवडणूक आयोगाचा बाप काढतात. आयोगाने पैसे घेतल्याचं सांगतात. विधिमंडळाला चोर बोलतात. त्यांना कोणी किंमत देत नाही. त्यांच्यावर मला बोलायचं नाही. संजय राऊत कुणाचा माणूस आहे? ते पवारांचे की उद्धव ठाकरेंचे? ते कुणाचे आहेत? हे जगजाहीर आहे. राऊतांना राष्ट्रवादीच्या बाजूला उद्धव ठाकरेंना जाऊ द्याचे नाही. जोपर्यंत ठाकरे गट संपत नाही, तोपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत. राऊतांनी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

बाळासाहेबांचं नाव का घेता?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून गेल्या आठ महिन्यात 109 लोकाभिमुख निर्णय घेतले. तुम्ही अडीच वर्षात किती निर्णय घेतले? ते आधी सांगा ना. कोकणात वादळ आलं. शरद पवार 82 वर्षाचे आहेत. ते कोकणात चार दिवस थांबले. लोकांचे अश्रू पुसण्यासाठी. हे बाप बेटे कुठे होते? तुम्ही अडीच वर्षात बाहेर पडला का ते सांगा?, असा सवाल करतानाच बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन मुख्यमंत्री होऊ दिले असते का? याचं उत्तर द्या. उद्धव ठाकरे हे सूडाच्या भावनेने पेटलेले आहेत. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. बाळासाहेबांच्या मुलाचं पद गेलं असं ते सांगत आहेत. तुम्ही बाळासाहेबांचं नाव का घेता? त्यांच्या विचाराशी गद्दारी करून तुम्ही पद मिळवलं होतं, असंही ते म्हणाले.