रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरुन (Mumbai Goa Highway) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परशुराम घाटात आता रात्रीच्या वेळी कोणत्याही वाहनांवर निर्बंध नसणार आहेत. सर्व वाहनांसाठी मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या घाट रस्त्यांपैकी एक असलेला परशुराम घाट (Parshuram Ghat) वाहतुकीसााठी खुला करण्यात आला आहे. गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून या घाटातील वाहतुकीवर निर्बंध होते. रात्रीच्या वेळी या महामार्गावरुन अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आता गणेशोत्सवाच्या (Konkan Ganpati Festival) पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं या मार्गावर होणारी संभाव्य वाहतूक पाहता, हा निर्णय अनेकांना दिलासा देणारा ठरेल, असं बोललं जातंय. परशुराम घाटात गेल्या काही आठवड्यांपूर्वी जोरदार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे या घाटातील वाहतूकही अनेक तास बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून अवजड वाहनांसाठी घाटातून रात्रीच्या वेळी वाहतूक करण्यावरही निर्बंध घालण्यात आले होते.
जुलै महिन्यात रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपून काढलं होतं. त्याचा फटका परशुराम घाटालाही बसला होता. परशुराम डोंगराला भेगा गेल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. अखेर 5 जुलैपासून हा घाट वाहतुकीचासाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर काही मर्यादित वेळेत 14 जुलैपासून घाटातील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. पण अवजड वाहनांच्या एकेरी मार्गिकेसाठी हा घाट सायंकाळी 7 नंतर इतर वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा सर्वच वाहनांना हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसे आदेशही स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दरम्यान, गणेशोत्सव जवळ आल्यानं मोठ्या प्रमाणात गणेशभक्त कोकणात जाण्यासाठी याच मार्गाने जात असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याचीही भीती असते. अशावेळी घाटातील वाहतूक बंद ठेवली तर वाहतुकीचा बोजवारा उडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिकांच्या मागणीनंतर आणि ज्येष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार-लोकप्रतिनिधी यांच्या चर्चा करत अखेर परशुराम घाट पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र त्यासोबत कंत्राटदारास योग्य ती खबरदारी घेण्याचेही निर्देश देण्यात आलेत. 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन देण्यासोबत रात्री पुरेशा प्रकाशाची व्यवस्था, नियमित पेट्रोलिंग, क्रेन, पोकलेन, जेसीबी तैनात ठेवण्याबाबतही आवाहन करण्यात आलंय.