कोल्हापूर: सिनेमॅटिक लिबर्टिच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जात आहे. चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याने पुढच्या पिढीपर्यंत चुकीचा इतिहास जाईल. त्यामुळे कोणताही ऐतिहासिक चित्रपट निर्माण झाल्यावर त्याचं आधी महाराष्ट्रात स्क्रिनिंग व्हावं. त्यासाठी महाराष्ट्रात इतिहासकारांची समिती स्थापन करा. त्यानंतरच तो दिल्लीच्या सेन्सॉर बोर्डाच्या समितीकडे पाठवा, अशी मागणी माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी केली आहे. याबाबतचं पत्रं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
आज टीव्हीवर हर हर महादेव सिनेमा प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. राज्य सरकारला मी पत्रं पाठवणार आहे. त्यांनी एक इतिहासकारांची स्वतंत्र समिती स्थापन करावी. त्याचे प्रोटोकॉल सेट करावेत. पहिलं महाराष्ट्रात स्क्रिनिंग होऊन नंतर केंद्राच्या समितीकडे सिनेमा पाठवावा. कारण आम्हाला केंद्राच्या समितीवर विश्वास नाही. तिथं कोण इतिहासकार बसलेत त्याची आम्हाला कल्पना नाही, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
हर हर महादेववाल्यांनी सांगितलं सेन्सॉर बोर्डची आम्हाला परवनगी आहे. सेन्सॉर बोर्ड हे दिल्लीत बसले आहे. त्यांच्याकडे कोणते इतिहासकार आहेत माहीत नाही. राज्याच्या इतिहासकारांची समिती नेमणं गरजेचं आहे. पहिलं स्क्रिनिंग महाराष्ट्रात व्हावं. नंतर पुढच्या स्क्रिनिंगसाठी दिल्लीत सिनेमा पाठवा. ही माझी विनंती आहे, असंही ते म्हणाले.
इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवत असाल तर माझा त्याला वैयक्तिक विरोध असेल. सर्व शिवभक्तांचाही विरोध असणार आहे. ऐतिहासिक चित्रपट यावेत. त्याबद्दल दुमत नाही. पण सिनेमॅटिक लिबर्टिचा फायदा घेतला जात आहे.
त्यात इतिहासाची मोडतोड केली जात आहे. जो इतिहास दाखवला जातो, नवीन पिढी तोच इतिहास घेऊन पुढे जाणार आहे. दुर्देवाने आजच्या पिढीचं वाचन कमी झालं आहे. जे सिनेमात दाखवलं जातं तेच खरं मानलं जातं. म्हणून सिनेमॅटिक लिबर्टिच्या नावाखाली काहीही दाखवू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
माझा विरोध निर्मात्याला नाही. दिग्दर्शकालाही नाही. कुणी सिनेमा काढला त्यांनाही नाही. फक्त सिनेमॅटिक लिबर्टिच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करण्याला माझा विरोध आहे. चुकीचा इतिहास कुणीही दाखवू नये. माझ्या या भूमिकेमागे कोणताही स्टंट नाही किंवा कोणताही राजकीय हेतू नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.