शंकर देवकुळे, प्रतिनिधी, सांगली : सद्यस्थितीत पाऊस लांबला आहे. अल निनोचे संकट आले तर जुलै अखेर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा कोयना धरणात ठेवण्यात आला आहे. माणसे आणि जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले. टप्प्याटप्प्याने उपसा बंदी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत शेतीला पाण्याचा पुरवठा करणे अवघड आहे. जनतेने पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ या योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे झाली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे होते. त्यावेळी ते बोलत होते.
जूनचा मध्यावधी संपला तरी पाऊस झालेला नाही. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे माणसे आणि जनावरे यांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही. पिण्याच्या पाण्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही. याची दक्षता घेऊन यंत्रणांनी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
या बैठकीत त्यांनी टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे बुद्रुक या योजनांचा आढावा घेतला. कोयना धरणात 11.74 टीएमसी तर वारणा धरणात 11.28 टीएमसी पाणीसाठा आहे. कोयनेतून सध्या 1050 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. टेंभू योजनेचे 9 पंप सुरू असून 12 टीएमसी पाणी उचलले गेले आहे.
ताकारी योजनेतून 4.85 टीएमसी पाणी उचलले आहे. म्हैसाळ योजनेतून 7.20 टीएमसी पाणी उचलले आहे. नदीवरील उपसा 21 टीएमसी असा एकूण 45 टीएमसी पाण्याचा उपसा झालेला आहे. कोयनेतून 1050 क्युसेक्स पाणी सोडणे सुरू असले तरी नदीतील डोह भरल्याशिवाय पाणी पुढे प्रवाहित होत नाही. नदीपात्रात पाणी अत्यंत अत्यल्प आहे.
पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणे सद्यस्थितीत आवश्यकच आहे. उपसा बंदी लागू करण्यात आल्याची माहिती या बैठकीत जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली. आरफळ योजनेतील रखडलेले पाणी योजनेचे काम तातडीने मार्गी लावा त्यासाठीचा आवश्यक ड्रोन सर्व्हे, मोजणी करून घ्या.
भूसंपादनासाठी नोटीसा बजावा, कागदोपत्री प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्या, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. नदीकाठच्या गावांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही. जेथे तलावातून पाणी पुरवठा होतो तेथे यंत्रणांनी संबंधित गावांमध्ये बैठका घ्याव्यात. पाण्याची स्थिती लोकांना समजावून सांगावी. तलाव कोरडे पडू नयेत यासाठी तातडीने लोकांना विश्वासात घेवून पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
यावेळी सुरेश खाडे यांनी आवश्यकता भासल्यास टँकरची तजवीज करा. त्यासाठी आराखडे तयार करा. गावनिहाय पाण्याचा उपलब्धतेचा अहवाल तयार करा. पण कोणत्याही स्थितीत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्या, असे सांगितले.