सांगली : अत्यंत संवेदनशील रोमहर्षक निवडणूक झालेल्या सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणाचे वर्चस्व राहणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज झालेल्या सभापती निवडीमध्ये बाजार समितीवर शिंदे गटाच्या शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी तर उपसभापतीपदी काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची निवड झाली आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू केला.
शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी धक्कातंत्राचा वापर करत गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानामध्ये विरोधकांना गाफील ठेवत 10 विरुद्ध 8 मताने विजय मिळविला. 9-9 समान जागा निवडून येऊनही शिवसेनेने बाजार समितीवर सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का बसला आहे.
सभापती निवडीमध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या युतीकडून सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख तर उपसभापती पदासाठी दादासाहेब हुबाले यांनी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि रासपाच्या आघाडीकडून सभापती पदासाठी शिवसेनेच्या संतोष पुजारी तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या राहुल गायकवाड यांनी अर्ज दाखल केला होता.
दोन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने दुपारी दोन वाजता गुप्त मतदान पार पडले. मतदानांतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या संतोष पुजारी आणि काँग्रेसच्या राहुल गायकवाड यांना प्रत्येकी दहा तर राष्ट्रवादीच्या हणमंतराव गायकवाड आणि दादासाहेब हुबाले यांना प्रत्येकी आठ मतदान झाले.
आटपाडी तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीकडे लागले होते. सकाळपासून निवडीकडे लोकांची उत्सुकता ताणली होती. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाकाची आतषबाजी करून आटपाडी शहरातून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.
राज्यात काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक यश मिळालं. तर भाजप आणि शिवसेनेला त्या तुलनेने कमी जागांवर यश मिळालं. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालेलं बघायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेस आणि ठाकरे गटालादेखील चांगलं यश मिळालेलं बघायला मिळालं.
आता आगमी काळात राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.