सातारा : महाराष्ट्रात सर्वत्र नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची (Nagar Panchayat Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण (Patan) तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अति महत्त्वाच्या पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena) ,काँग्रेस,भाजप आणि राष्ट्रवादी (NCP) या राजकीय पक्षाचे गट समोरासमोर उभे ठाकले आहेत. मात्र, या निवडणुकीत विरोधी शिवसेना,भाजप आणि काँग्रेस या राजकीय पक्षांनी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात आपले पॅनेल उभे करून पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पाटण नगरपंचायतीवर आपली वर्षानुवर्षे सत्ता असतानाही या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या ‘घड्याळाच्या’ चिन्हावर न लढता पाटणकर गटांतच निवडणूक लढविण्याची नामुष्की सत्ताधारी राष्ट्रवादीच्या पाटणकर गटावर ओढवली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही पाटण मधून ‘घड्याळ’ गायब झाल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू झाली असून ही निवडणूक एकूण 17 प्रभागांसाठी जाहीर झाली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने पाटण शहरातील 4 प्रभागातील निवडणुकांना यामुळे ब्रेक लागला होता. 4 जागांसाठी जानेवारी महिन्यात मतदान पार पडेल. तर, आता ही 13 जागांसाठी निवडणूक होत असून 41 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष पॅनेल,शिवसेना, भाजप व काँग्रेस अशा लढत होणार आहे
नगरपंचायत निवडणुकीसाठी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने आपले संपूर्ण पॅनेल उभे करून सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षापुढे तगडे आव्हान उभे केले आहे. मात्र, सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या विक्रमसिंह पाटणकर गटाने पक्षाच्या अधिकृत ‘घड्याळ ‘ या चिन्हा पेक्षा गटाला अधिक महत्व देऊन शिवसेनेच्या आव्हानाला समोर जायचे ठरवले आहे.
त्यामुळेच या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असला तरी आता शिवसेना विरुद्ध पाटणकर गट अशीच मुख्य लढाई होणार आहे. शंभूराज देसाई या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा बँकेतील पराभवाचा वचपा काढू शकतात, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.
परिणामी राष्ट्रवादी पक्षात अगोदरच असलेली अंतर्गत धुसफूस आणि खदखद चव्हाट्यावर येण्याची शक्यता वाढल्याने राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत घड्याळ हे चिन्ह न वापरता राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गट असे या गोंडस नावाच्या पॅनेलची ओळख करण्यात आली आहे. पाटणकर गटाच्या सर्व उमेदवारांकडुन प्रचारात घड्याळ चिन्ह असलेले राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे गळ्यातील मफलर सरस वापरले जात आहेत. मात्र, उमेदवारांचे निवडणुक चिन्ह घड्याळ नाही हा विरोधाभास समोर येतो आहे. या उलट मंत्री देसाई यांनी मात्र गतवेळ पेक्षा अधिक ताकतीने या निवडणुकीत उतरून शिवसेनेच्या धनुष्यबाण याच चिन्हावर ते ही संपूर्ण पॅनेल उभे केले आहे.
शिवसेनेच्या शंभुराज देसाई यांच्या कडव्या आव्हानामुळे येथे जिंकणे सोपे नसल्याने व सत्तासाठी राष्ट्रवादीचे नेते विक्रमसिंह पाटणकर यांनी निवडणूकीत पक्ष चिन्हाला तिलाजंली दिली असल्याचे मत राजकीय विश्लेषक राम जगताप यांनी व्यक्त केलंय.
आमच्या पक्षाकडे अनेक इच्छुक उमेदवार होते सर्वांना उमेदवारी देणे शक्य नसल्याने पक्ष चिन्हावर येथे लढत नाही. पाटण शहरावर राष्ट्रवादी पक्षाचा प्रभाव असल्याचे सांगत निवडणुकीत पक्ष चिन्ह नसल्याच्या निर्णयाचे समर्थन करुन इतर पक्ष आपला पक्ष रुजविण्यासाठी येथे पक्ष चिन्हावर लढत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संजय इंगवले यांनी दिली.
निवडणुकीत पक्ष चिन्ह न वापरण्याच्या पाटणकर गटाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बाबत चुकीचा संदेश जनतेकडे गेला असल्याची प्रतिक्रिया पाटण मधील नागरिक नाना पवार यांनी दिली. विक्रम सिंह पाटणकर नेहमी पक्ष चिन्ह रुजले पाहिजे या आग्रही भुमिकेत असतात मात्र यावेळी नगरपंचायत निवडणुकीत ही भुमिका बाजुला ठेवल्याचे दिसते आहे. कारण, आजपर्यंत कायम पाटण मध्ये सत्तेत असूनही विकास करता आला नसल्याने हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही राष्ट्रवादी पक्ष चिन्हावर का लढत नाही ? असा प्रश्न राजकिय वर्तुळासह पाटण मधील नागरिक व मतदार यांना पडला आहे
इतर बातम्या:
अर्थव्यवस्थेला अच्छे दिन, चालू आर्थिक वर्षात जीडीपी 9.3 टक्के राहण्याचा अंदाज; ब्लूमबर्गचा अहवाल
Satara Patan Nagar Panchayat Election NCP leader Vikramsinh patankar group not contest on party symbol Shambhuraj Desai slam NCP leaders