जळगाव : कोरोना काळात एकीकडे शासन विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून शैक्षणिक सवलत देत आहे. असं असताना दुसरीकडे जळगाव शहरातील ओरियन स्कूलमध्ये मात्र फी न देणार्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याबाबत थेट शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापतीची भेट घेत पालकांनी या शाळेवर कारवाईची मागणी केली. यानंतर जिल्हा परिषद सभापतींकडून कारवाईचा इशारा देण्यात आला.
शहरातील काही खासगी शाळांकडून सक्तीची फी वसूल केली जात असल्याचे काही घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र स्टुडंट युनियनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या दरम्यान शिक्षणाधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संबंधित शाळांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र यानंतरही ओरियन स्कूलसह इतर शाळांकडून फी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून तसेच शिक्षणापासून वंचित ठेवल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टुडंट यूनियनकडे केली.
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर स्टुडंट युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेत भेट दिली. यावेळी शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. फी न भरल्यामुळे शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील जळगाव शहरातील एम जे कॉलेज रोडवरील ओरियन स्कूलच्या प्राचार्यांना या प्रकाराबाबत जाब विचारला.
याबाबत शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांची भेट घेऊन संबंधित शाळेवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. ओरियन स्कूलचे प्राचार्य ब्रूस हॅडरसन यांनी या विषयावर बोलताना थोड्या फार प्रमाणात फी भरल्यावरच विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर दिले जातील, असं उत्तर दिलंय.
शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी संबंधित पालकांनी तक्रार केली आहे. याबाबत शिक्षणाधिकार्यांशी चर्चा करून या शाळेला नोटीस देण्यासह इतर कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती दिली.
School deny exam to students for not being able to pay fee amid Corona in Jalgaon