पंढरपूर : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख करणारी पोस्टर मुंबईत काही ठिकाणी लागली. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही भावी मुख्यमंत्री उल्लेख करणारी पोस्टर लागली होती. सुप्रिया सुळे यांच्या पोस्टरनंतर राष्ट्रवादीचे दोनचार जण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर शिवसेना नेते आणि आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत टीका केली आहे. राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने म्हणजे सुहाने सपने आहेत, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
राष्ट्रवादीमध्ये 4-5 भावी मुख्यमंत्री आहेत. अजून काही जणांची सुप्त इच्छा आहे. हे सर्व सुहाने स्वप्नं आहेत. राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघू नये, असा चिमटा शहाजी बापू पाटील यांनी लगावला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकाही केली.
आम्ही आमदार गुवाहाटीत असताना उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी कायदेशीर लढाई जिंकलो. त्यामुळे सध्याच्या न्यायालयीन लढ्यातही आम्हाला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच संजय राऊत यांचे नामकरण करून संजय आगलावे असे केले पाहिजे. संजय राऊत यांचा समतोल बिघडला असून बेभान होऊन ते सर्वांवर आरोप करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
राऊत हे कधीच मातोश्रीशी एकनिष्ठ नव्हते. मातोश्रीचे राजकारण उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं. श्रीकांत शिंदे यांच्यावर राऊत यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. बेभान झालेले राऊत कसेही वागत आहेत. राऊत यांचे सगळे संपलेलेल आहे. म्हणून जाताजाता ते सगळ्यांना बदनाम करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवण्याचे काम केले आहे. उद्धव साहेब आणि संजय राऊत यांचे भविष्य काय असणार हे सांगण्या इतपत मी मोठा नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभी केलेली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना मोठी होणार आहे. बाळासाहेबांचे स्वप्न आणि विचार आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत, असं ते म्हणाले. राऊत हे तोल गेलेला माणूस आहे. उद्धव साहेबांची सहानुभूती संपवण्याचे काम करत आहेत. ठाकरेंची सुपारी त्यांनी घेतली आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.