जळगाव : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती केली आहे. आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या या प्रयत्नांना खिळ बसणार असल्याचं दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीवर भाष्य करणं टाळणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच वंचितवर सडकून टीका केली आहे. शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी ही बी टीम असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे वंचित आघाडीला महाविकास आघाडीचे दरवाजे बंद झाल्याचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज जळगावमध्ये आहेत. मीडियाशी संवाद साधताना शरद पवार यांनी वंचित आघाडीवर टीका केली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांना दुसराच प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पवार यांनी थेट वंचित आघाडीचं अंतरंगच उघडं केलं आहे. मागच्या निवडणुकीत आम्हाला नुकसान सहन करावं लागलं होतं. वंचित बहुजन आघाडीमुळे आम्हाला ते नुकसान झालं होतं.
त्यांनी कुठं काम करावं हा लोकशाहीत त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल मला काही आक्षेप घ्यायचा नाही. पण महाराष्ट्रावर काय परिणाम होईल हे माहीत नाही. पण काही वेळेला राजकारणात स्वत: लढायचं असतं. दुसरं पायात पाय घालण्यासाठी एक दोन टीम तयार करायच्या असतात. त्याला साधारणत: ही राजकारणाची बी टीम म्हणतात. आता ही बी टीम आहे की नाही ते कळेल, असं शरद पवार म्हणाले.
यावेळी शरद पवार यांनी भाजप कोणत्या कोणत्या राज्यात नाही याची यादीच दिली. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना, ओडिशा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही. यूपीत भाजप आहे. मध्यप्रदेशात आहे. पण मध्य प्रदेशात भाजपचं राज्य नव्हतं. तिथे कमलनाथ यांचं सरकार होतं. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. गोव्यात काँग्रेस होती. आमदार फोडले. खोक्याचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातही खोक्यांचा कार्यक्रम झाला, असं त्यांनी सांगितलं.
बहुसंख्य राज्यात लोकांनी भाजपला बाजूला ठेवलं आहे. लोक देशपातळीवरही वेगळा विचार करतील असं वाटतं. असं असेल तर एकत्र बसून सर्वांनी विचार केला पाहिजे. लोकांच्या इच्छांची पूर्तता केली पाहिजे. मोठी आश्वासने द्यायची आणि काहीच करायचं नाही. शेतीमालाचा भाव दुप्पट करणार सांगायचं आणि काही करायचं नाही. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. नोकऱ्या दिल्याचं सांगतात, प्रत्यक्षात काही नाही. या सर्व गोष्टी बदलायच्या असतील तर परिवर्तन हाच त्यावर पर्याय आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
निवडणुका लवकर होतील की नाही हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीच याबाबत ठरवेल. राज्यांचे निकाल पाहिल्यानंतर कोणताही शहाणा माणूस निवडणुका घेईल असं वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.