नगर : काय सांगावे कदाचित 2024 नंतर परिस्थिती बदलली तर शरद पवार पंतप्रधानही होतील. असा दावा बुजुर्ग नेते यशवंतराव गडाख यांनी केला आहे. शरद पवार यांची एकंदर कारकीर्द संघर्षाची आहे. त्यांच्याकडे एक ऊर्जा आहे, जनता ही त्यांची ऊर्जा आहे. वैयक्तिक प्रश्न, तब्येतीचे प्रश्न आले पण त्यांनी त्यावर मात केली. याही वयात ते लोकांमध्ये जातात. लोकांमध्ये फिरत आहेत, ही हिंमत 82/83 व्या वर्षी या माणसात आहे. हा शेवटचा माणूस आहे इतकं राजकारण करणारा, दिल्लीत आजही त्यांचं वजन आहे, असे गौरवोद्गारही यशवंतराव गडाख यांनी काढले आहे.
यशवंतराव गडाख यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकतात असं भाकीत वर्तवलं. तसेच पवारांना पंतप्रधानपद का मिळालं नाही यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, कारण दिल्लीतील काँग्रेसमधील चौकडी कानाला लागायची आणि दिल्लीतून त्यांचं नाव कापण्यात यायचं. नरसिंह राव आणि शरद पवार यांच्यात पक्षांतर्गत निवडणूक झाली यात मी माझं मत पवारांना दिलं होतं. मात्र दिल्लीतील चौकडीमुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असा दावा यशवंतराव गडाख यांनी केला.
गडाख यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेवरही भाष्य केलं. बाळासाहेब ठाकरे यांची आणि माझी मैत्री होती. त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन मी केले होते. विधानसभेला विचारणा झाली आमच्यासोबत राहाल का? मंत्रीपदासाठी नाही. शंकरराव भेटून आले. त्यांना छान वाटले. मग मी उद्धव साहेबांशी बोललो. मंत्रिपद द्या अथवा न द्या तुमच्या सोबत राहू, असं त्यांना सांगितलं. जुन्या लोकांना डावलून त्यांनी आम्हाला मंत्रिपद दिलं. त्यामुळे मी शंकरराव यांना सांगितलं की आता उद्धव साहेब यांच्या सोबतच राह्याचं. आम्हालाही प्रलोभने होती पण आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलो, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
असे प्रसंग आणि संकट आयुष्यात अनेकवेळा येतात. माझ्यावरही अनेक प्रसंग आले. मी फक्त बोललो होतो तरीही माझी खासदारकी गेली आणि सहा वर्षे निवडणुकीला उभे न राहण्याची शिक्षा केली. पण मी धीराने तोंड दिले. उद्धव ठाकरे सुद्धा धीराने तोंड देत आहेत. लाखांच्या सभा होत आहेत. त्यातून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो, सर्वसामान्य लोक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत हे दिसून येत आहे, असंही त्यांनी स्पष्टकेलं.
उद्धव ठाकरे हे 100 टक्के राजकारणी नाहीत. गद्दारांना तोंड देऊ शकत नाही म्हणून मी राजीनामा दिला असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र महाराष्ट्रातील जनता याला उत्तर देईल. 2024 ला महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला मतदान करेल. निवडणूक निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.