सांगली : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघं वर्ष बाकी असल्याने या घटना घडामोडींना अधिकच वेग आला आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने तर देशाचं राजकारण ढवळून निघालं. दुसरीकडे विरोधी पक्षही भाजपच्या विरोधात एकवटण्यास सुरुवात झाली आहे. असं असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठी ऑफर दिली आहे. आठवले यांची ही ऑफर पवार स्वीकारतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आठवले यांच्या ऑफरवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय प्रश्नांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांना थेट एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. शरद पवारांनी आता एनडीएसोबत यावे. नागालँडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत यावे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. मोदींकडून पवारांचें अनेक वेळा कौतुक झाले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. त्यावरही आठवले यांनी भाष्य केलं. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई योग्य आहे. राहुल गांधी हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईत भाजपाचा संबंध नाही. राहुल गांधी यांनी आपले तोंड सांभाळून बोलले पाहिजे. मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेसचा फायदा होत नाही आणि पक्ष वाढत नाही, असा चिमटा आठवले यांनी काढला.
यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या सभेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये. भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील ते बघावे. भोंग्याना विरोध करू नये. राज ठाकरे यांनी चांगले काम करून आपला पक्ष वाढवावा, असा सल्लाही त्यांनी दिला. बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. शिवसेना घालवण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे जबाबदार, असंही ते म्हणाले.
यावेळी आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली. शिर्डीमधून पुन्हा लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी बोलून शिर्डीची जागा मागून घेणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 2 जागा मिळाव्यात, असंही ते म्हणाले.