जालना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. 50 आमदारांना घेऊन त्यांनी वेगळी वाट धरली. या आमदारांना घेऊन ते थेट गुवाहाटीला पोहोचले होते. या बंडामागे भाजपचा हात असल्याचं उघडही झालं. भाजप नेत्यांनीही तशी कबुली दिली. पण शिंदे यांना केवळ भाजपचंच बळ नव्हतं. तर अनेकांचे आशीर्वादही होते. एका अध्यात्मिक गुरुनेही शिंदे यांना गुवाहाटीत असताना फोन केला होता. तुम अच्छा कर रहे हो, असं म्हणत शिंदे यांना आशीर्वाद दिला होता. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
जालन्यात शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकरही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री श्री रविशंकर यांनीच आपल्याला गुवाहाटीत असताना फोन केला होता, असा गौप्यस्फोट केला.
आम्ही जेव्हा गुहाटीला होतो तेव्हा गुरुजींनी मला आशीर्वाद दिले. मल त्यांनी कॉल केला. श्री श्री रविशंकर गुरुजी म्हणाले, अच्छा काम कर रहे हो, असं सांगतानाच बाकी मी काही बोलत नाही. सर्व तुम्हाला माहीत आहे, असं सूचक विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.
श्री श्री रवी शंकर याचे काम खूप मोठे आहे. आम्ही जेव्हा दाओसला गेलो, तेव्हा 1 लाख 37 हजाराची कमाई केली. आम्ही उद्योगाला रेड कार्पेट टाकलाय. गुरुजी दाओसला देखील आले होते. त्यांनी तिथे ही आशीर्वाद दिला, असंही ते म्हणाले.
एकाच दिवसात अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले. अडीच वर्षात सर्व सण बंद होते. आपलं सरकार आलं तेव्हा पुन्हा सण-उत्सव सुरू केले, असं त्यांनी सांगितलं. मोदी सरकारने खूप चांगले निर्णय घेतले, अर्थसंकल्पात सर्वांचा समावेश केला. अर्थसंकल्पातून सुटला असा एकही घटक नाही. सरकार आपल्या पाठीशी उभे आहे, असं ते म्हणाले.
तुम्ही या ठिकाणी आलात ही भूमी पावन झाली. आजचा विषय जीवन मरणाचा प्रश्न आहे. जलतारा उपक्रमामुळे शेतीला फायदा होईल. बबनराव लोणीकर पाणीपुरवठा मंत्री होते. त्यांनी चांगलं काम केले. आमच्या मागच्या सरकारमध्ये जल संधारण योजना आदर्श योजना होती. मात्र दुर्दैवाने मागची अडीच वर्षे ही योजना बंद होती, अशी टीका त्यांनी तत्कालिन ठाकरे सरकारवर केली.
आता जलतारा योजना आम्ही सरकार मार्फत राबवली जाईल. शेतकऱ्यांची आत्महत्या कमी करण्याला आमचं प्राधान्य असणार आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. जनतेचे आहे. लोकांचा विकास करणं हाच आमचा ध्यास आहे. आमचा इतर कोणताचा अजेंडा नाही, असंही त्यांनी सांगितलं.