चंद्रपूर : डॉ. शरयू पाझारे (Dr. Sharyu Pajare) यांच्या पाझारे यांच्या पाझारे नर्सिंग होम येथील गर्भपात केंद्राची तपासणी करण्यात आली. यासंदर्भात 13 मे 2022 रोजी पीसीपीएनडीटी सल्लागार समिती बैठकीत निर्णय घेतला होता. मनपाच्या आरोग्य विभागानं ( Municipal Health Department) ही तपासणी केली. अभिलेखांची देखभाल न केल्याचे तपासणीत आढळले. या कारणानं वैद्यकीय गर्भपात केंद्र बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली. तीस दिवसांची बंदी लावण्यात आली आहे. या कालावधीत गर्भपात केंद्रात काही घटना घडल्यास मनपा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असंही बजावण्यात आलं.राज्य शासनानं वैद्यकीय गर्भपात केंद्रासाठी (Medical Abortion Center) नियमावली लागू केली. पण, काही केंद्र या नियमांची पायमल्ली करताना दिसून येतात. जिल्हा समितीच्या बैठकीत यावर मंथन करण्यात आले.
बाबूपेठ येथील डॉ. शरयु सुधाकर पाझारे यांच्या पाझारे नर्सिंग होम येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी प्रमाणपत्र तीस दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. तसेच वैद्यकीय गर्भपात केंद्र सील करण्यात आले. अभिलेखांची देखभाल न केल्याने पीसीपीएनडीटी व वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लघंन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. मनपाच्या आरोग्य पथकाने ही कारवाई केली. बाबूपेठ येथील वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई करण्यात आली. त्यामुळं शहरातील नर्सिंग होम संचालकांचे धाबे दणाणलेत.
वैद्यकीय गर्भपात केंद्रात आढळलेल्या त्रृटींची पूर्तता करून त्यासंबंधीच अहवाल मनपाच्या आरोग्य विभागाला सादर करावा लागेल. चंद्रपूर मनपाच्या आरोग्य विभागाकडून पुन्हा तपासणी होईल. निकष पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय गर्भपात केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. वैद्यकीय गर्भपात कायद्या अंतर्गत कडक तरतुदी असताना गर्भपात केंद्र संचालक त्याकडं दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येते.