मनोज गाडेकर, शिर्डी, अहमदनगर : राज्यातील कृषी विद्यापीठांनी विविध पिकांमध्ये संशोधन केले. नवनवीन वाण तयार केले आहेत. ही एक प्रकारे त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून शेतकर्यांची केलेली सेवा आहे. कृषी शास्त्रज्ञ हे शेतीचे खरे सैनिक असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती अब्दुल सत्तार यांनी केलंय. राहुरी कृषी विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची 51 वी बैठकीचे उद्घाटन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे हस्ते पार पडले. याप्रसंगी सत्तारांनी हे वक्तव्य केलंय.
शास्त्रज्ञ असो की संशोधक, घरचा मामला कंट्रोलवाला असला तर बाहेर बाहेर काम करू शकत नाही. माझ्या बायकोने सपोर्ट केल्यामुळे इथपर्यंत पोहचलो. आम्ही केलेली क्रांती आणि संशोधन कमी नाही. समोरच्या माणसाच्या पोटात, ओठात आणि बटन दाबणाऱ्या बोटात काय? याचंही संशोधन आम्ही करतो. हे आमचं राजकीय संशोधन आहे, असा आपल्या खास शैलीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाषणातून फटकेबाजी केली.
काँग्रेस नाव आलं की लफडं होतं. कुलगुरूंना लोकसभा, विधानसभा लढवायची नाही. कृषी विद्यापीठाच्या संदर्भात एका संस्थेच्या नावात काँग्रेस उल्लेख असल्याने सत्तार यांनी कुलगुरुंकडून माहिती जाणून घेतली.
मला अगोदर मराठी येत नव्हती. राजकारणात आल्यावर मी काय बोलायचो, ते लोकांना कळतं नव्हते. आता मला हिंदी नीट बोलता येत नाही. मराठी भाषेत संभाषण करायला खूप मजा येते. मात्र हिंदीला विरोध नाही, असही सत्तार म्हणाले.
बाहेर राज्यातून येणाऱ्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या भूमीत मराठी बोलायला शिकावं. पुढच्यावेळी तुमचे भाषण मराठीत ऐकायला आवडेल, असंही सत्तार परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी यांना उद्देशून म्हणाले.