सांगली : ती येते… आपला परफॉर्मन्स करते अन् सर्वांची मनं जिंकून जाते. गौतमी पाटील, नृत्य आणि गर्दी हे समीकरण आता फिट्ट झालं आहे. सध्याच्या मौसमात गावागावात, जत्रांमध्ये केवळ आणि केवळ गौतमी पाटील हिच्याच कार्यक्रमांची चलती आहे. गौतमीने आपल्या गावात येऊन कार्यक्रम करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या गावात गौतमीचा कार्यक्रम नसेल अन् तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गौतमीचा कार्यक्रम असेल तर गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो तरुण कार्यक्रमाच्या ठिकाणी जातात. अगदी मुक्कामही करतात. ग्रामीण भागातील तरुणांना गौतमीचं इतकं वेड लागलं आहे. एका एसटी चालकालाही गौतमीची अशीच भुरळ पडली असून त्याने गौतमीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी चक्क दोन दिवसाची सुट्टीच टाकली आहे.
गावात गौतमी पाटील येणार आहे. त्यामुळे दोन दिवसांची सुट्टी द्या, असा रजेचा अर्ज एका एसटी चालकाने डेपो मॅनेजरला केला आहे. त्याचा हा रजेचा अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सांगलीच्या तासगाव डेपोतला हा एसटी चालक आहे. त्याने चक्क गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी रजा टाकली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ज्या नावाने हा अर्ज व्हायरल केला आहे, त्या चालकाने असा कोणताही अर्ज केला नसल्याचं उघड झालं आहे. तसा रजेचा अर्ज तासगाव एसटी आगाराकडे आला नसल्याचंही कळतं. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणाने अर्ज व्हायरल केल्याचे प्रकार घडला आहे.
या अर्जाचं सत्य वेगळं असलं तरी आणि एसटी चालकाने अर्ज केला नसला तरी हा गंमतीशीर अर्ज आता सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. एसटी चालकाने 22 आणि 23 मे रोजी सुट्टी मागितल्याचं अर्जातून स्पष्ट होत आहे. हा अर्ज व्हायरल झाल्यानंतर गौतमीच्या चाहत्यांनी तो आणखीनच व्हायरल केला आहे. तर या अर्जावर सदर एसटी चालकाची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे या अर्जाबाबतचा संभ्रमही कायम आहेच.
दरम्यान, गौतमी पाटील हिचा आज बार्शीत कार्यक्रम होणार आहे. तसं तिने सोशल मीडियावर एका व्हिडीओतून स्पष्ट केलं आहे. राजेंद्र गायकवाड मित्र मंडळाच्यावतीने बार्शीतील जैन मंदिरासमोर कुर्दवाडीत सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन गौतमी पाटील हिने केलं आहे. त्यामुळे आजच्या बार्शीतील कार्यक्रमाला तुफान गर्दी होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.