नांदेड / राजीव गिरी : नांदेडमध्ये नादुरुस्त एसटी बसेसमुळे अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसतेय. अशीच एक घटना आज सकाळी घडली. धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बसने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. मुदखेड नांदेड रस्त्यावर सीता नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. या धडकेत कारमधील डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. मुदखेड येथील डॉ. अमोल सरसे हे गंभीर जखमी झाले. सरसे यांना नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय.
डॉ. सुरवसे हे मुदखेडमध्ये खाजगी रुग्णालय चालवतात. कारने ते नांदेडहून मुदखेडकडे जात असताना बसच्या धडकेत जखमी झाले. मुदखेड शहरात ते रुग्णसेवा हॉस्पिटल नावाचे खाजगी रुग्णालय चालवतात.
महाराष्ट्र राज्य परिवहनाची बस आज सकाळी मुदखेडहून नांदेडला चालली होती. नांदेड येथील सीता नदीच्या पुलावर येताच एसटीचे स्टेअरिंग लॉक झाले. यामुळे एसटी कारला धडकली. या धडकेत कारमध्ये प्रवास करणारे मुदखेडचे डॉ. अमोल सरसे हे गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित नांदेडला पुढील उपचारासाठी नेण्यात आले.
नांदेड मुदखेड उमरी या मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस ह्या कायमस्वरूपी नादुरुस्त असतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच असे अपघात घडतात. त्यामुळे या भागातील नागरिक एसटी बस ऐवजी रेल्वेने प्रवास करण्यास पसंती देतात. याकडे एसटी महामंडळाने लक्ष देण्याची गरज आहे.
रस्त्यावरील खड्डे चुकवताना पोलिसांच्या वाहनाची ट्रकला धडक बसून तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना आज सकाळी नंदुरबारमध्ये घडली. जखमींमध्ये पोलीस निरीक्षकाचा समावेश असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.