सोलापूर : पुढील आठवड्यापासून सोलापूर शहरातील शाळांची घंटा वाजणार आहे. शहरातील आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. शासनाने मंगळवारी (10 ऑगस्ट) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात सोलापूर शहराचा समावेश आहे. आता शाळा सुरू करण्यासाठी सोलापूर महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. यानुसार आता पुढील मंगळवारपासून आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 565 रुग्ण आढळले आहेत. सोलापूर ग्रामीण भागातील 9 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय, तर सोलापूर शहरात गेल्या 24 तासात एकाही कोरोना बाधित मृतांची नोंद नाही.
सोलापूर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे नवे 3 रुग्ण आढळले आहेत. यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जिल्ह्यातील एकूण म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 637 वर पोहचलीय, तर आत्तापर्यंत 38 जणांचा मृत्यू झालाय.
सोलापूरमधील बार्शी शहर व तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा हळूहळू वाढू लागला आहे. बार्शी तालुक्यात एकाच दिवसात 62 कोरोना रुग्ण आढळले. मागील पाच दिवसात 96 रुग्ण आढळून आल्यानंतर 24 तासात 62 नवे रुग्ण आढळले. यापैकी एक जणाचा कोरोनाने मृत्यू झालाय.
सोलापूर ग्रामीण भागात आठवडा बाजार भरू नये यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायतींकडून आवाहन करण्यात आलेय. मागील आठवड्यात वळसंग येथे आठवडा बाजार भरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळेच आता प्रशासनाने हे आवाहन केलंय. टीव्ही 9 मराठीच्या बातम्यांची दखल घेत पोलिसांनी आणि ग्रामपंचायतींनी आठवडी बाजार न भरवण्याचं आवाहन केलंय.
ग्रामपंचायतींकडून सायकलवर स्पीकर लावून बाजारात न येण्यासाठी आवाहन करण्यात येतंय. तसेच नियमांचं पालन न केल्यास कारवाई करण्याचा पोलिसांनी इशारा दिलाय.