सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 13 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवा वगळून पंढरपूरसह 5 तालुक्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश काढले आहेत. याला व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध केलाय. व्यापाऱ्यांनी विरोध करण्यासाठी पंढरपूर शहरात रस्त्यावर येत आज (10 ऑगस्ट) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात घंटानाद आंदोलन केलं. तसेच प्रदक्षिणा मारली.
व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्येही घंटानाद आंदोलन केलं. किमान यानंतर तरी सरकारला जाग यावी म्हणून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि घंटानाद आंदोलन करत असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली. संतप्त व्यापाऱ्यांनी सलग 3 दिवस आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलक व्यापाऱ्यांकडून आज पहिल्या दिवशी घंटानाद आंदोलन करण्यात आलं. उद्या (11 ऑगस्ट) अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे. 13 ऑगस्टला मात्र लॉकडाऊनचे आदेश झुगारून सर्व व्यापारी आपआपली दुकाने उघडी ठेवणार आहेत. सोलापूर शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण अत्यल्प असल्याचा दावा करत प्रशासनाने शहरावर लॉकडाऊन लादला असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय.
दरम्यान, सोमवारीच (9 ऑगस्ट) सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेश येईपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, कसमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं हे नवे आदेश लागू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे कोरोना निर्बंधांबाबतच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनीही या तालुक्यांचा उल्लेख करत कोरोना वाढीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं रात्री हा आदेश काढला आहे.