विद्यार्थ्यांना तुडवावी लागते चिखलातून वाट, चंद्रपूर जिल्ह्यातील हे महामार्ग आहेत बंद

| Updated on: Jul 28, 2023 | 3:47 PM

राजुरा ते गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. शेतकरी कर्मचारी शालेय विद्यार्थ्यांचे बेहाल आहेत. रुग्णांना उपचारासाठी राजुरा येथे वेळेत पोचता येत नाही.

विद्यार्थ्यांना तुडवावी लागते चिखलातून वाट, चंद्रपूर जिल्ह्यातील हे महामार्ग आहेत बंद
Follow us on

चंद्रपूर : जिल्ह्यात शाळेसाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास बघायला मिळाला आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथे ही घटना उजेडात आली आहे. मागील दोन वर्षापासून राजुरा -गोवरी मार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे हे काम पावसाळ्यात सुरू आहे. नागरिकांना ये जा करण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग तयार करण्यात आलेला नाही. नाल्यावरील कच्चा रपटा पावसामुळे वाहून गेल्याने नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास करावा लागत आहे. मात्र या विद्यार्थ्यांच्या हाल अपेष्टा बघून प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड रोष आहे.

राजुरा ते गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. शेतकरी कर्मचारी शालेय विद्यार्थ्यांचे बेहाल आहेत. रुग्णांना उपचारासाठी राजुरा येथे वेळेत पोचता येत नाही. बस सेवा बंद झालेली आहे. या मार्गावरील वाहतूक आणि वर्दळीचा रस्ता असताना पुलाचे काम प्राधान्याने करणे गरजेचे होते. गोवरी येथे गोयेगाव आणि माथरा येथील विद्यार्थी हायस्कूलमध्ये शिकण्यासाठी येतात. तसेच राजुरा येथे महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी शेकडो विद्यार्थी गौरी, पवनी, कडोली येथून ये- जा करतात.

राजुरा-गोवरी मार्गाचा संपर्क तुटला

मात्र शैक्षणिक हंगामातच रस्त्याची दुरावस्था असल्याने राजुरा-गोवरी मार्गाचा संपर्क तुटलेला आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा आंदोलन केलेले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीसुद्धा प्रशासनाला निवेदन दिलेले आहे. मात्र केवळ पोकळ आश्वासने देऊन प्रशासनाने नागरिकांची दिशाभूल केली आहे.

विद्यार्थी शिवाजी काळे म्हणाला, पुलाचे काम सुरू असल्याने आम्हाला रपटा बनवून दिला आहे. आम्ही मातरा येथून गोवरी येथे शिकायला जातो. रपटा पावसामुळे वाहून गेला आहे. बस गावात येऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेतातून पायी वाट काढून शाळेत जावे लागते.

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

शिवाजी हायस्कूलचे शिक्षक श्री बुटले म्हणाले, उन्हाळ्यात ठेकेदाराने वेळेवर काम पूर्ण केले नाही. पुलाचे काम अर्धवट राहिले. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिकडे-तिकडे पाणीच पाणी असल्याने विद्यार्थी शाळेपर्यंत पोहचू शकत नाही. जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शाळेत येतात. पण, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण राहणार, असा सवाल त्यांनी विचारला.

चंद्रपुरातील हे मार्ग बंद

१) राजुरा -बल्लारपूर

२) राजुरा – सास्ती

३) धानोरा -भोयगाव

४)गौवरी कॉलनी – पोवणी

५)तोहोगाव

६)कोरपना – कोडशी (अधे मधे बंद चालू स्थितीत )

७)रूपापेठ – मांडवा (अधे मधे बंद चालू स्थितीत )

८) जांभूळधरा – उमरहिरा (अधे मधे बंद चालू स्थितीत )

९) पिपरी – शेरज

१०) पारडी – रुपापेठ (अधे मध्ये बंद चालू स्थितीत)

११) कोडशी – पिपरी

१२) कोरपना – हातलोणी (अधे मध्ये बंद चालू स्थितीत)

१३) कुसळ – कातलाबोडी – कोरपना

१४) शेरज – हेटी ( अधे मधे बंद चालू)

१५) वनसडी – भोयगाव