गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सध्या गडचिरोली पोलिसांकडून (Gadchiroli Police) अनेक माध्यमाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे योजनेचे लाभ देण्यात येत आहे. यामुळं अनेक नक्षल चळवळीतून नक्षलवादी आत्मसमर्पण (Naxal Surrender) करीत आहेत. तिमा मेंढी हा नक्षलवादी नक्षल दलामध्ये कार्यरत होता. काही काळ अगोदर नक्षल चळवळीतून बाहेर येऊन गडचिरोली पोलिसांसमोर तिमाने आत्मसमर्पण केले. एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलीस स्टेशन अंतर्गत मेंढरी गावातील रहिवासी आहे. या आत्मसमर्पित नक्षलवादी तिमा मेंढीवर (Tima Mendhi) काल नक्षल दलमने कुर्हाडीने हल्ला केला. क्रूरतेने तिमाची हत्या केली.
रस्त्याच्या कडेला मृतदेह टाकून तिथे नक्षलवाद्यांनी एक पत्रक पण सोडले. या पत्रकामध्ये मजकूर उल्लेख केला. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. सदर घटनेमुळे एटापल्ली तालुक्यात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटना करणारे नक्षलवादी छत्तीसगड राज्यातून आल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे.
तिमा मेंढी हा काही काळ नक्षली चळवळीत कार्यरत होता. पण, त्यानंतर त्यानं पोलिसांना आत्मसमर्पण केलं. एटापल्ली तालुक्यातील मेंढरी येथे राहू लागला. सामान्य जीवन जगू लागला. ही बाब नक्षल्यांना पसंत पडली नाही. त्याच्यावर पोलिसांचा खबऱ्या असल्याचा नक्षल्यांना संशय होता. त्यामुळं कुऱ्हाडीनं वार करून तिमाची हत्त्या करण्यात आली. यामुळं आत्मसमर्पित केलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.