व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : वनविभागाच्या नर्सरी आहेत. या नर्सरीमध्ये जंगलात लावण्यासाठी रोपे तयार केली जातात. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वनकर्मचारी काम करतात. पण, काही कर्मचारी दारुच्या आजारी जातात. आपण कर्तव्यावर आहोत, याचेही त्यांना भान नसते. अशीच एक घटना कोरची तालुक्यात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. झालं असं की वनकर्मचाऱ्यांची काळी कामं नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी त्याचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यावर अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे या वनकर्मचाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
शासकीय नर्सरीत कार्यालयीन कार्यालयीन वेळेत दारूची पार्टी करणे क्षेत्र सहायक व वनरक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. दारूची पार्टी करणाऱ्या बेडगाव वनपरिक्षेत्रात कार्यरत क्षेत्रसहायक आणि वनरक्षकाला देसाईगंज उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी निलंबित केले. त्यामुळ वनविभागात खळबळ उडाली आहे. कोरची तालुक्याअंतर्गत बेडगाव वनपरिक्षेत्र कार्यालय येते.
या कार्यालयात कार्यरत असलेले क्षेत्र सहायक अजय गहाणे आणि वनरक्षक बबलू वाघाडे यांनी वन विभागाच्या मोहगाव येथील नर्सरीत कार्यालयीन वेळेत दारूची पार्टी केली होती. दोघेही मद्यधुंद अवस्थेत कार्यरत होते. रोपवाटिकेत आलेल्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. नागरिकांनी संबंधितांचे चित्रीकरण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली होती.
कर्तव्यावर कसूर करून दारूच्या नशेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी वरिष्ठांना करण्यात आली होती. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दोषी अधिकाऱ्यांना १२ जुलै रोजी निलंबित केले. या कारवाईमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.