गोंदिया : कोरोना काळात अनेकजण पोरके, अनाथ झालेत. त्यामुळे हा काळ अनेकांसाठी आव्हानाचा राहिलाय. त्यात गोंदिया सारख्या दुर्गम जिल्ह्यातील परिस्थिती तर आणखीच विदारक आहे. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील डवकी येथे उईके दाम्पत्याचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जाण्यानं त्यांची तीन मुलं अनाथ झाली. देवरी तालुक्यातील डवकी या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर पायदळ रस्ता तुडवत गेलं की मग शेतामध्ये असलेले एकमेव घर म्हणजे या पोरक्या लेकरांचं घर.
सध्या ते म्हाताऱ्या आजी-आजोबांकडे राहतात. खेलुराम उईके (68 वर्ष) असं या आजोबांचं नाव. मात्र, एकूणच परिस्थिती हलाखीची असल्यानं या अनाथ मुलांचे हालच होत होते. हे पाहूनच एका शिक्षकाने दातृत्व दाखवता मदतीचा हात पुढे केला.
खेलुराम उईके आणि भागरता उइके या वृद्ध आजी आजोबांचा एकुलता एक मुलगा प्रकाश उईके आणि सून लता उईके यांचे 3 वर्षापूर्वी मलेरिया आजाराने निधन झाले. ते मुलांना जीवनाच्या अर्ध्या वाटेवरच सोडून गेले. त्यामुळे या 3 निरागस चिमुकल्या मुलींचा सांभाळ आजी आजोबा करीत आहेत. परंतु आमच्यानंतर यांचं काय? हा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
संध्या (वय 10 वर्ष), डिलेश्वरी (वय 7 वर्ष), राजनंदनी (वय 5 वर्ष) हे आई वडिलांचे छत्र हरपलेल्या मुली आहेत. आज त्यांचा सांभाळ 65 पार असलेले आजी आजोबा करीत आहेत. ही बाब त्या शिकत असलेल्या जिल्हा परिषद डवकी येथील शिक्षकांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारलीय.
या शिक्षकाने सामाजिक बांधिलकीची जपणूक करीत या चिमुकल्यांकरीता कपडे, पुस्तकं, वह्या,अन्नधान्य आणि नगदी स्वरूपात आर्थिक मदत केली. या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. लोकनाथ तितरम असं या शिक्षकाचं नाव आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीसाठी त्यांचं सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
Teacher help three orphan children in Davaki Devari Gondia