बुलडाणा : चिखली तालुक्यातील जालना-खामगाव महामार्गावरील उत्तरादा-पेठच्या पुलावर अचानक पैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे जालनाकडे पार्सल घेऊन जात असलेला कंटेनर पुलावर अडकला. यामध्ये दोन जण अडकले होते. मात्र ठाणेदार नागेश चतरकर आणि नायब तहसीलदार हरी वीर यांच्या पुढाकाराने दोघांचेही प्राण वाचले. संबंधित घटना ही मंगळवारी (28 सप्टेंबरला) घडली.
बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील उत्तरादा पेठच्या पुलावरुन पाणी वाहत असताना पार्सल घेऊन जाणारा कंटेनर पुलावर अगदी मधोमध अडकला. या कंटेनरमध्ये चालकासह त्यांचा मुलगाही होता. या घटनेची माहिती चिखली तहसीलचे नायब तहसीलदार हरी वीर आणि अमडापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांना स्थानिक नागरिकांनी दिली. यावेळी नायब तहसीलदार वीर आणि ठाणेदार चतरकर यांनी समन्वय साधून आपल्या टीम सह घटनास्थळाकडे धाव घेतली. तर त्यांच्या मदतीला दहिगाव येथील तरुण ही धावले.
गावातील राजू नेमाडे हा तरुण जलतरणपटू असल्याने तो पाण्याच्या प्रवाहात दोरी घेऊन गेला. पाण्यात अडकलेल्या कंटेनर ला दोरीने घट्ट बांधून नायब तहसीलदार वीर आणि ठाणेदार चतरकर त्यांच्या मदतीला स्वतः पाण्यात उतरले. विशेष म्हणजे नायब तहसीलदार हरी वीर हे सेवानिवृत्त आर्मी जवान आहेत. त्यांनी नावाप्रमाणे वीरता दाखवत, ठाणेदार चतरकर यांची चतुराई वापरत सर्व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी कंटेनरमधील अडकलेल्या चालकाच्या पुत्राला आणि झाडावर अडकलेल्या चालकाला दोरीच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढले.
विशेष म्हणजे चालक पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो कंटेनरवर चढला होता. त्याने नदीतील एका झाडाचा आसरा घेतला होता. तर मुलगा हा कंटेनरमध्ये अडकून पडला होता. दोघांकडून मदतीची याचना सुरु होती. अखेर ठाणेदार आणि तहसीलदार यांच्यासह इतर तरुणांनी या दोघांनाही रेस्क्यू करत त्यांचे प्राण वाचवले. या घटनेनंतर पंचक्रोशित नायब तहसीलदार आणि ठाणेदार यांचं कौतुक होत आहे.
पावसामुळे सध्या राज्यातील अनेक भागांमधील नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात देखील अशीच एक घटना समोर आली आहे. भडारवाडी शिवारातील तेरणा नदीच्या पुलावरुन 32 वर्षीय वसंत कांबळे वाहून गेले. ते शेतात काम करायला गेले होते. शेतातून घरी परतत असताना नदीला अचानक पूर आला. त्या पुराच्या पाण्यात पडून ते वाहून गेले. त्यांचा शोध सध्या सुरु आहे.
नांदेडमध्ये कालपासून पावसाने उसंत दिली असली तरी गोदावरी नदीच्या पाण्यात कमतरता झालेली नाही. जायकवाडी, येलदरी धरणातून पाणी सोडल्याने गोदावरीचे पाणी धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचलंय. विष्णुपुरी बंधाऱ्याचे पंधरा दरवाजे चोवीस तासांपासून उघडे असून त्यातून 7300 क्युमेंक्स वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे नांदेडमध्ये सखल भागात पाणी साचले आहे. तसेच पूरसदृश्य स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेडची ही पूरसदृश्य स्थिती दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज जलसंपदा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गोदावरी नदीच्या या पुरामुळे लहान ओढे नाले आणि उपनद्या तुंबल्या असून शेतीचे नुकसान वाढतच चाललंय.
हेही वाचा :
प्लीज आई-बाबांना समजव, भावाला ऑडिओ मेसेज पाठवून गर्भवतीची आत्महत्या