नीलेश डाहाट, TV9 मराठी, प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी (Bramhapuri) तालुक्यातल्या उचली गावात गेल्या एक वर्षापासून अजगराची दहशत निर्माण झाली होती. तब्बल नऊ बकऱ्या फस्त करणारा 12 फुटी अजगर (Ajgar)पकडण्यात अखेर यश आले आहे. ग्रामस्थांना गावालगत शेतशिवारात एक महाकाय अजगर सतत दिसायचा. या अजगराने एक-एक करत गावातील तब्बल नऊ बकऱ्या फस्त केल्या. अजगराचा वावर असल्याने गावकरी शेतात जायला घाबरायचे. तसेच लहान मुलांना लगतच्या भागात जाण्यास प्रतिबंध (Prohibition )करण्यात आले होते.
शेतकरी ढोंगे यांची चौथी बकरी अजगराने मारली. ही माहिती अर्थ कंजरवेशन ऑर्गनायझेशन संस्था सदस्यांना देण्यात आली. सर्पतज्ज्ञ ललित उरकुडे, विवेक राखडे, चेतन राखडे व ईशान वठे यांनी घटनास्थळावर धाव घेतली.
सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने अजगराला पकडले. महाकाय अजगर जेर बंद झालेला बघून गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
हा अजगर एकूण बारा फूट लांबीचा होता. या आकाराचा अजगर ब्रम्हपुरी भागात आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. या अजगारामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, अशी माहिती संघर्ष जगझापे यांनी दिली.
या अजगरानं तब्बल नऊ बकऱ्या भस्त केल्या होत्या. त्यामुळं शेतकरी संतप्त झाले होते. एका शेतकऱ्याच्या तर चार शेळ्या या अजगरानं गिळंकृत केल्या होत्या. त्यामुळं या अजगराला कसं पकडता येईल. यासाठी गावकरी चिंतेत होते. अखेर सर्पमित्रांनी अजगराला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार आहे.