जितेंद्र बैसाणे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळच्या अतिदुर्गभ भागात यंत्रणेच्या कामचुकार पणामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. या ठिकाणी आजही अनेक शिक्षक फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच झेंडा फडकवण्यासाठीच येतात. असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला कारणीभूत कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. तोरणमाळ खोऱ्यातील अनेक गावे आजही शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून कोसो दूर आहेत. या भागात शाळाबाह्य मुलांचा विचार करून शासनाने तोरणाळमध्ये आंतराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात आली. याच खोऱ्यातील जवळपास 16 वाड्या पाड्यांवरच्या शाळा या आंतराष्ट्रीय शाळेत समायोजित केल्या. मात्र आजही या खोऱ्यात जिल्हा परिषदेच्या 14 शाळा सुरु आहेत. त्यांची अवस्था पाहिल्यास याठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत असेल का, असाच प्रश्न निर्माण होतो.
फलई गावच्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था तर अत्यंत दयनिय. वर्षभरापासून शाळेचे पत्रे उडून गेले. शाळा नादुरुस्त अवस्थेत असल्याने वर्षभरापासून शाळाच भरत नाही. शिक्षक फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला येत असल्याची तक्रार गजेंद्र पावरा करतात.
तोरणमाळच्या खोऱ्यातील खडकी जिल्हा परिषद शाळेला बारा पाड्यांचे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या पाड्यांची शाळेपासूनचे अंतर पाहता विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठीच आठ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करावा लागतो. या शाळेत पटावर विद्यार्थ्यांची संख्या 92 इतकी आहे.
आम्ही भेट दिली तेव्हा विद्यार्थ्यांची उपस्थिती बोटावर मोजण्याइतकी दिसली. मुळातच शाळेत चार शिक्षकांची नियुक्ती असली तर प्रत्यक्षात एक शिक्षण शाळेत हजर राहत नसल्याचं दिसून आलं. बाकीचे शिक्षण नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाजासाठी धडगावला गेल्याचं उत्तर उपस्थित शिक्षकांनी दिलं.
अशीच काहीसी विदारक परिस्थिती ही झापी, सावऱ्या लेकडा, गेंदा, पाटील पाडा गोरंबा, इंडीपाडा, सेंगला पाणी, सिंगलखेतपाडा या पाड्यांवरील शाळांची आहे. या शाळा वर्षानुवर्षे नादुरुस्त आहेत. त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्तावही या शाळेतील शिक्षण जिल्हा परिषदेकडे सादर करत नाही. शिक्षक नियमित येत नसल्याने विद्यार्थ्यांना गणवेश व पोषण आहारदेखील मिळत नसल्याचा आरोप देखील ग्रामस्थांकडून केला जात आहे.
या साऱ्या विदारक शैक्षणिक परिस्थितीबाबत शिक्षण विभागाच्या साऱ्याचं बड्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. नाहीतर शाळेवर शिक्षक उपस्थित नसताना शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी हे शाळांना भेट देत नाही. शहानिशा न करता फक्त या अनुपस्थित शिक्षकांचा पगार काढतात का, असा प्रश्नदेखील समोर येत आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील शिक्षक महिना महिना अनुपस्थित राहत असल्याबाबत आपल्याला तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगतात. यावर चौकशी करून कारवाईचे संकेत देखील त्यांनी दिले आहे. नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे यांनी दिले.
तोरणमाळच्या याच खोऱ्यात आजही पाचशेच्या आसपास शाळाबाह्य मुलांचा दावा तिथले ग्रामस्थ करत आहेत. चांगल्या शिक्षणासाठी अनेकांना घर दारापासून शेकडो किलोमीटरवरच्या आश्रमशाळांचा सहारा घ्यावा लागत आहे.