उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्ष तथा वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड (Nitin Bikkad) यांच्यावर झालेल्या गोळीबार (Firing) प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. गोळीबाराचा हा प्रकार दिल्ली येथील रेन्यू सूर्या रोशनी कंपनीच्या पवनचक्की टेंडर (Tender)वरून झाला असल्याचा पुरवणी जबाब बिक्कड यांनी दिला आहे. कंपनीचे के राजा कुमार व कंपनीचा वेंडर कुलदीप देशमुख यांनी घडवून आणला असावा, असा संशय बिक्कड यांनी जबाबात व्यक्त केला आहे. या पवनचक्की कंपनीचे काम उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागात सुरु असून त्यांना मोठा राजकीय वरदहस्त आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून तपासाची चक्रे झपाट्याने फिरवण्यास सुरवात केली आहेत. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह सहाय्यक पोलीस एम रमेश यांच्यासह पोलीस निरीक्षक सुरेश दळवे, पोलीस उप निरीक्षक पवन निंबाळकर यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करीत आहेत. या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन भेटी दिल्या आहेत.
नितीन बिक्कड यांच्या गाडीवर शनिवारी अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. बिक्कड यांच्या गाडीवर 2 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी ही गाडीच्या समोरच्या काचेवर मध्यभागी लागली. सुदैवाने या हल्ल्यात बिक्कड सुखरुप बचावले आहेत. पारा -फक्राबाद रोडवर बिक्कड त्यांच्या गावी जात असताना हा गोळीबार झाला. गुन्हा नोंद करण्याची कारवाई वाशी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरु होती. (The attack on the sarpanch in Osmanabad was claimed through a tender)