अहमदनगर : जिल्ह्यात कायद्याचा धाक कमी होऊ लागला असून गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामुळे अनेक खळबळजनक घटना सध्या नगर शहर परिसरात घडू लागल्याचेच समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) आहे की नाही असाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच दरम्यान आता एमआयडीसी भागातील सह्याद्री चौक परिसरामध्ये एका युवकाचा खून झाल्याची घटना घडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा खून (Murder) एका शुल्लक कारणावरून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. प्रवीण कांबळे असे मृत युवकाचे नाव आहे. तर याप्रकरणी मयत प्रवीण कांबळेंच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. तसेच चार आरोपींना ताब्यात घेतले असून अजून काही आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी भागातील सह्याद्री चौक परिसरामध्ये एक वडापावचे दुकान आहे. तेथे मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास मयत प्रवीण कांबळे त्या दुकानावर गेला. तेथे त्याने वडापाव खाण्यासाठी मागितला. मात्र दुकानदाराने त्याला वडापाव 20 रुपयेला असल्याचे सांगितल्यानंतर ५ रुपये कमी करा या गोष्टीवरून दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले.
त्यावेळी वडापाव दुकानदाराच्या मदतीला आसपास असलेल्या काही लोकांनीही प्रवीण कांबळे याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर प्रवीण यास गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी प्रवीण कांबळे याचा मृत्यू झाला. यानंतर प्रवीण कांबळे याच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून अजून काही आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.