वसई : वसईत महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावलेल्या इनोव्हा कार (Innova Car)ने तीन अपघात (Accident) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इनोव्हा कार चालकाने दारूच्या नशेत गोखीवरे ते मधूबनपर्यंत गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास तीन अपघात केले आहेत. या अपघातात एका महिलेचा मृत्यू (Death) झाला असून 2 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्या इनोव्हा कार चालकाने दारूच्या नशेत अपघात केला आहे, त्या कारमध्ये महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग असे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे शासनाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची ही कार असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. अपघातानंतर मद्यधुंद कारचा चालक आणि गाडीतील अन्य 2 जण तात्काळ फरार झाले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.
वसईच्या वालीव पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन अपघातग्रस्त गाडीचा ताबा घेऊन ती गाडी मुख्य रस्त्यावरून बाजूला केली. पण महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लिहिलेल्या कार दारू पिऊन चालवणारा चालक आणि त्यामधील अन्य दोन फरार झालेल्यांचा पोलीस शोध घेत आहेत. शासनाचा बोर्ड लावूनच दारू पिऊन गाडी चालवत लोकांचा अपघात करत असतील तर यात मयत किंवा जखमी झालेल्या व्यक्तीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. आता वालीव पोलीस यात काय कारवाई करतात की शासनाची कार असल्याने सोडून देतात हे पाहणे महत्वाचे आहे. (The driver of the Innova car blew up the three in Vasai)