गडचिरोली : कोणाच्या मनात केव्हा काय येईल काही सांगता येत नाही. पण, प्रत्येकाच्या मनातील भावना हा दुसरा व्यक्ती समजू शकत नाही. प्रत्येकांच दुःख वेगळं असते. ज्याचं जळतं त्यालाचं कळतं. त्यातून तो व्यक्ती काही घातक निर्णय घेत असतो. पण, टोकाला जाऊन निर्णय घेण्यापूर्वी त्याने थोडा विचार करायला हवा की हाच अंतीम निर्णय आहे का. कारण समस्या असते, तर त्यावर उपायही असतात. ते उपाय शोधणे गरजेचे आहे. अन्यथा रडत बसावे लागते.
आरमोरी शहरापासून काही अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. वैनगंगा नदीच्या पुलावरून एका तरुण महिला पोलीस शिपायाने नदीत उडी घेतली. ही घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. शारदा नामदेव खोब्रागडे (वय ३० वर्षे) असे पोलीस शिपायाचे नाव आहे.
शारदा खोब्रागडे मुळची सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी आहे. सध्या ती गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे.
शारदा खोब्रागडे यांनी पुलावर आपली दुचाकी उभी केली. तिथेच मोबाईलसुद्धा ठेवला आणि थेट नदीत उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
काही घटना या मनाला चटका लावून जातात. अशीच ही घटना गडचिरोलीत घडली. यामुळे नेमकं काय घडलं हे ज्याच त्यालाच माहीत. पण, सर्वांना धक्का बसला एवढं मात्र नक्की. पोलीस शिपाई असलेल्या कर्मचाऱ्यानं असा निर्णय घेणे हे धोकादायक आहे. पण, त्यांनी असा निर्णय का घेतला. त्यामागे कारण काय आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं हे तपासात मिळतील.