शिर्डी : शिर्डी येथे साईबाबांचे मंदिर आहे. या मंदिरात दानातून बरेच पैसे येतात. त्यामुळे श्रीमंत मंदिर अशी या देवस्थानाची ओळख. या देवस्थानाला मिळत असलेले दान काहींना खुपते. त्यातून काही जण या मंदिराच्या विरोधात वातावरण तयार करतात. असाच एक प्रकार सध्या घडत आहे. काही समाजकंटकांनी समाज माध्यमात एक पोस्ट व्हायरल केली. यात ते संस्थानाची बदनामी करताना दिसून येत आहेत. पाहुयात काय आहे हे प्रकरण.
साईबाबा संस्थानने हज यात्रेसाठी 35 कोटी रुपये दिले. मात्र राम मंदिरासाठी पैसे दिले नाही. असा अपप्रचार सध्या समाज माध्यमात सुरू आहे. अशा प्रकारे कुठलाही निधी देण्याची तरतूद संस्थान अधिनियमात नाही. साईबाबा संस्थानने या बातमीचे खंडण केलंय.
गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमात साईबाबा संस्थान हज यात्रेसाठी 35 कोटी निधी दिला. मात्र अयोध्येतील राम मंदिरासाठी नाही, असा अपप्रचार केला जातोय. साईबाबा संस्थानने असा कुठलाही निधी दिला नाही.निधी देण्याची तरतूदच नसल्याचं साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटलंय.
साईबाबा संस्थानला बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. संबंधित समाज माध्यम आणि अपप्रचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं राहुल जाधव यांनी म्हंटलं.
साईबाबांनी सर्वधर्म समभावाची शिकवण देत सबका मालिक एक हा महामंत्र जगाला दिला. मात्र गेल्या काही दिवसांपासून साईबाबांची जात आणि धर्मावरून वाद उपस्थित केले जाताहेत. आता हज यात्रेला निधी दिल्याचा खोटा अपप्रचार करून साईबाबा संस्थानला बदनाम केले जात असल्याचंदेखील जाधव म्हणाले.
शिर्डी ग्रामस्थही आता अशा अप्रचारामुळे आक्रमक झालेत. आजवर आम्ही संयम ठेवला. मात्र जर असंच सुरू राहीलं तर जशास तसं उत्तर देवू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.