सांगली : मिरज पूर्व भागात पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईला ग्रामपंचायतींना तोंड देण्याची वेळ आज आली आहे. ही दुष्काळ परिस्थिती येण्यापूर्वी 7 हजार लोकवस्तीच्या सलगरे ग्रामपंचायतीने धाडसी निर्णय घेतला. अवघ्या दीड महिन्यात महाराष्ट्र राज्यातील सलगरे ग्रामपंचायतीने 125 फूट रुंद आणि 95 फूट खोल विहीर खोदली. विहीर काढून गावाच्या पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवला. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत मालकीची एकमेव सर्वात मोठी विहीर असल्याचा बहुमान मिरज तालुक्यातील सलगरे ग्रामपंचायतीला मिळाला आहे. सलगरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तानाजी पाटील यांच्यामुळे हे अशक्य काम शक्य झाले आहे.
सलगरे ग्रामपंचायतीवर 25 वर्षे निर्विवाद सत्ता असताना सलगरे गावात तानाजी पाटील यांनी विकास कामाचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या पत्नी आज सरपंचपदी निवडून आल्या आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पाणीपुरवठा करणारा तलावातील पाण्याने तळ गाठला. पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकीतील पाणी गावाला कमी पडू लागले. गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली. आज 125 फूट रुंद 95 फूट खोल विहीर काढल्याने पाण्याचा मुबलक साठा लागला आहे. पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागल्याने गावातील महिलांनी आज समाधान व्यक्त केले आहे. सरपंच जयश्री पाटील यांच्या नेतृत्त्वात ही विहीर बांधली.
शासनाकडून या विहिरीसाठी 35 लाख रुपये तुटपुंजा निधी मंजूर झाला. पण आज विहिरीला 57 लाख पेक्षा जास्त खर्च आला आहे. शासनाचे कचखाऊ 25 वर्षाचे धोरण आज बदलण्याची वेळ आली आहे. ब्रिटिश कालीन शंभर वर्षाच्या योजना अमलात आणण्याची वेळ आली आहे. आणखी निधी जर शासनाने दिला तर सलगरे गावचा100 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अशी माहिती माजी सरपंच तानाजी पाटील यांनी दिली आहे.
गावात पाण्याचा प्रश्न होता. शासकीय योजना कमी पडत होत्या. त्यामुळे गावकऱ्यांनी लोकसहभाग घेतला. सरपंचांनी यासाठी पुढाकार घेतला. गावातील पाणीप्रश्न मिटेल, अशी सध्यपरिस्थिती आहे. शासकीय मदत मिळाली. पण, ती तोकडी होती.