गडचिरोली : येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री धर्मारावबाबा आत्राम म्हणाले, कोण येतंय कोण जातंय याचा विचार न करता आपल्या पक्षाला बळकटी कशी मिळेल, याचा विचार आपण करायला हवा. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहे. या निवडणुकीत आपल्याला यश संपादित करून पक्षाची ताकद वाढवायची आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात आपण काम केले तरच आपल्याला लोकसभेत तग धरता येईल असे मत माजी मंत्री धर्मराव आत्राम यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकांच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतो. मागे सिरोंचा येथे पूर आला त्यावेळी 18 तास प्रवास करून आम्ही पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेलो. भाजपचे लोक सर्व झाल्यानंतर तिथे आले आणि फोटो सेशन करून गेले असा थेट आरोपही धर्मराव आत्राम (Dharmarao Atram) यांनी केला. यावेळी माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम, आमदार मनोहर चंद्रीकापुरे (Manohar Chandrikapure), जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर (Ravindra Wasekar), महिला अध्यक्षा शाहीन हकीम, युवक अध्यक्ष लिलाधर भरडकर, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त लोक जिंकून आणायचे आहेत, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. गडचिरोली जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीत आपले राजकारण बेरजेचे असल्याने आपल्या पक्षाची दारं सदैव येणाऱ्यांसाठी उघडी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त लोक जिंकून आणायचे आहेत, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे गेले तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज गडचिरोली येथे आढावा बैठक घेतली. आपल्या पक्षाची नोंदणी सुरू आहे. या भागात चांगली नोंदणी व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असेही जयंत पाटील म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या परिस्थितीवर आपण चिंतन करायला हवे. क्रियाशील सदस्यांची संख्या आपल्याला वाढवायला पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या भागात प्रयत्न करा. लोकांच्या मनात राष्ट्रवादीविषयी विश्वास निर्माण करा, असे आदेशही जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना दिले. पूर, अतिवृष्टीने गडचिरोली संकटात सापडला आहे. मला समाधान आहे की, या संकटाच्या काळात आपण त्या नागरिकांच्या सोबत उभे राहिलात. मला सर्व कार्यकर्त्यांचा अभिमान आहे अशा शब्दात जयंत पाटील यांनी कौतुक केले. आपला पक्ष तरुणांचा असून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना धर्माबाबांसारख्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन आहे. त्यामुळे आपण जिल्हा राष्ट्रवादीमय करू शकतो अशी खात्रीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
सत्ता येते सत्ता जाते, कोणीही ताम्रपट घेऊन जमलेला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा पक्ष कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवतात. कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. अडचणी आहेत, खंत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कधी साथ सोडत नाही, असा विश्वास आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केला. आपण आपल्या संघटनेवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. या भागातील दोन्ही नगरपरिषदा आपण जिंकू शकतो. रडून उपयोग नाही आता लढावे लागेल. सध्याचे सरकार काही चांगल्या मार्गाने आलेले नाही. कपटाने आलेल्या गोष्टी फार काळ टिकत नाही, अशा परिस्थितीत आपण तयारीला लागायला हवे. अंतर्गत गटबाजी सोडून एकदिलाने काम करायला पाहिजे. एकमुखाची वज्रमुठ करा आणि लढा द्या असे आवाहनही आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांनी केले.