कोपरगाव : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात समृद्धी महामार्गावर आयशर वाहनाला मागून क्रुझर वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनेत पती-पत्नीसह दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. संतोष अशोक राठोड आणि वर्षा संतोष राठोड अशी मयत जोडप्यांची नावे आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत संतोष राठोड यांचा पाच वर्षाचा मुलगा, आई आणि नवविवाहित जोडप्यासह पाच ते सहा जण जखमी असून, त्यांच्यावर आत्मा मालिक रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मयतांचे शव शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष राठोड हे मूळचे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील गोसावी पांगरी येथील रहिवासी आहेत. मात्र कामानिमित्त ते कुटुंबासह मुंबईलगत असलेल्या विरारमध्ये राहत होते. लहान भावाच्या लग्नासाठी संतोष राठोड परिवारासह जालना येथे मूळगावी आले होते. 26 जून रोजी लग्न झाल्यानंतर ते 29 जून रोजी आपल्या परिवारासह क्रुझर वाहनाने रात्री समृध्दी महामार्गावरून मुंबईकडे निघाले होते.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात पोहोचल्यानंतर तेथून जाणाऱ्या आयशर टेम्पोला क्रुझर जीपने मागून जोराची धडक दिली. या अपघातात दीड वर्षाच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झाला तर क्रुझर चालकासह 5 ते 6 जण जखमी झाले. जखमींमध्ये संतोष यांचा भाऊ कृष्णा राठोड, त्याची पत्नी कोमल राठोड आणि आई बताबाई अशोक राठोड यांचा समावेश आहे. जखमींवर आत्मा मालिक हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. दरम्यान आयशर चालकाने क्रुझर जीप चालकाविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.