ऊर्जा कंपनीत वाघाची एंट्री; सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुक्तसंचार, वाघ कधी होणार जेरबंद?

| Updated on: Feb 20, 2023 | 11:48 AM

कंपनीच्या बाजूलाच वनविभागाचे आजनगाव बीट आहे. या ठिकाणाहून एक मोठा कालवा देखील गेला आहे. वाघ हा त्या ठिकाणाहून आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऊर्जा कंपनीत वाघाची एंट्री; सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुक्तसंचार, वाघ कधी होणार जेरबंद?
Follow us on

चंद्रपूर : वाघांच्या जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात ताडोबाच्या (Tadoba) बाहेरही मोठ्या प्रमाणात व्याघ्र दर्शन होते. वरोरा शहरालगत असलेल्या एमआयडीसी भागात जीएमआर ऊर्जा कंपनी परिसरात वाघाने प्रवेश केला आणि एकच खळबळ उडाली. वाघाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात वायरल झाला आहे. जीएमआर कंपनीमध्ये अनेक कामगार काम करतात. सुरक्षारक्षकाला वाघ दिसल्यावर त्याने याची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. वन विभागाची चमू सतर्क झाली. त्यानंतर सकाळी वाघाचे ताजे पगमार्क दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाघाचा मुक्तसंचार कैद झाला आहे.

वाघाला कैद करण्याचे आव्हान

कंपनीच्या बाजूलाच वनविभागाचे आजनगाव बीट आहे. या ठिकाणाहून एक मोठा कालवा देखील गेला आहे. वाघ हा त्या ठिकाणाहून आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता त्याला कैद करण्याचे मोठे आव्हान वनविभागाच्या पुढे आहे. याकरिता कॅमेरे लावण्यात आले आहेत. लवकरच त्याला पकडण्यात येणार आहे.

कामगारांनी चारचाकी वाहनाने जावे

कंपनीच्या वतीनेसुध्दा त्या जागी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. कामगारांना बाहेर न निघण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अत्यंत महत्त्वाच्या कामाकरिता कामगारांनी चारचाकी वाहनानेच जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वनकर्मचारी-नागरिक यांच्यात वाद

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी सुमारे ५० जणांचा बळी वाघांनी घेतला. त्यामुळे वन्यजीवांबद्दल नागरिकांच्या मनात तिटकारा आहे. एखादे जनावर जंगलात गेले तर वनविभागाचे कर्मचारी कारवाई करतात. एखादा व्यक्ती जंगलात गेला तर त्याच्यावर संशय व्यक्त केला जातो.गुन्हे दाखल केले जातात. मग, जंगलातला वाघ किंवा वन्यप्राणी गावात, शेतशिवारात आल्यास आम्हा काय करायचं असं जंगलाशेजारी राहणाऱ्या नागरिकांचा सवाल आहे. यावरून वनकर्मचारी आणि जंगलाशेजारी राहणारे नागरिक यांच्यात वाद होत असतात. वनविभागाने आपल्या वन्यजीवांना सांभाळावे, असा इशाराचं गावकरी देत आहेत. गावात शिरणाऱ्या या वाघांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. वनविभागाचे कर्मचारी या वाघाला केव्हा ताब्यात घेतात, हे पाहावं लागेल.