पालघर : पालघरमध्ये दगड खाण चालकांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. जिल्ह्यात सुरू असलेलं खाणींमधील उत्खनन दोन अल्पवयीन जीवावर बेतलं आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दगड खाणीतील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. लागोपाठ घडलेल्या दुसऱ्या मृत्यूने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पालघरमधील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी अवघ्या चार दिवसात बंद असलेल्या दगड खाणीमध्ये पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मनोर पोलीस अधिक तपास करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरशेती येथे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी केलेल्या उत्खननाच्या ठिकाणी 17 वर्षीय मुलगा बुडाला. यानंतर आज पुन्हा याच मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुटल येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्घटना घडली. या उभारणी वेळी उत्खनन करण्यात आलेल्या दगड खाणीतील पाण्यात बुडून 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.
या दोन्ही घटनांनंतर पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या दगड आणि मुरूम उत्खननाच्या ठिकाणी महसूल विभागाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली सुरू असल्याचं उघड झालंय. दगड अथवा मुरूम उत्खनन करताना किंवा उत्खनन केल्यानंतर या तयार होणाऱ्या खाणींसभोवती कुंपण घालणं बंधनकारक आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील खाण चालक आणि कंपन्या याकडे दुर्लक्ष करत असल्याच चित्र आहे. त्यामुळे अशा दगड खाणींमध्ये नाहक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतोय.
या दोन्ही घटनांनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महसूल विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिकांकडून दगड आणि मुरूम उत्खनन करणाऱ्या कंपन्या, मालकांविरोधात आणि प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय.