नालासोपारा / विजय गायकवाड : लोकलच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करु नका अशा सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतात. मात्र प्रवासी प्रशासनाच्या या सुचनेकडून वारंवार दुर्लक्ष करतात. परिणामी अपघातातच्या घटना घडतात. अशीच एक घटना नालासोपारा विरार दरम्यान घडली आहे. लोकल ट्रेनमध्ये दरवाजाला लटकून प्रवास करताना दोघे तरुण लोकलमधून पडले. परंतु दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले. दोघेही जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिंटो राजकुमार मोहंतो आणि हरिश्चंद्र तुलसीदास पालव असं दोघांची नाव असून, दोघेही नालासोपारा पूर्व येथील रहिवासी आहेत.
मुंबईला जाणारी लोकल पकडण्यासाठी विरारला नालासोपाऱ्याहून रिटर्न चालले होते. यावेळी नालासोपारा-विरार दरम्यान दोघेही तोल जाऊन लोकलमधून पडले. सकाळी 8.15 ते 8.25 दरम्यान हा अपघात झाला. दोन वेगवेळ्या लोकल ट्रेनमध्ये या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. रेल्वे पोलिसांनी तात्काळ तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने यात तरुणांचा जीव बचावला आहे.
रेल्वेच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी विरार स्थानकात घडली आहे. मृतांमध्ये आई-वडिल आणि तीन महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. विरारहून वसईला जाणारी लोकल पकडण्यासाठी एका प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडून चालले होते. यावेळी एक्स्प्रेसने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला.
पती-पत्नी सूरत येथून आपल्या नवजात बाळाला घेऊन विरार येथे उतरले. यानंतर विरारहून लोकल पकडून त्यांना वसईला जायचे होते. मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली.