सातारा : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती घराण्यातील तीन राजांसह राज्याचे मंत्री शंभुराजे देसाई यांच्यावर घणाघाती टीका केली होती. राजे हे अनाजी पंतांचे चेले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. राऊत यांचा संपूर्ण रोख माजी खासदार संभाजी छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या दिशेने होता. थेट छत्रपतींच्या घराण्यावरच राऊत यांनी टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. राऊत यांच्या टीकेचा खासदार उदयनराजे भोसले यांनी खास आपल्या स्टाईलने समाचार घेतला आहे. निर्लज्जपणाची हद्द झाली, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली.
उदयनराजे भोसले यांनी थेट संजय राऊत यांच्या स्वभावावरच बोट ठेवलं. संजय राऊत यांचा स्वभाव विकृत आहे. या विकृत स्वभावामुळेच ते राजघराण्यावर वारंवार टीका करत आहेत. ही विकृती वाढत चालली आहे. राजघराण्यावर बोलताना मोजूनमापूनच बोललं पाहिजे. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करण्याची गरज नाही, असं सांगतानाच मी संजय राऊत यांना ओळखत नाही. त्यांना महत्त्वही देत नाही, असं उदयनराजे म्हणाले.
मागे याच संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले होते. त्यांची विकृती इतक्या टोकाला पोहोचली आहे. सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोकं काहीही बरळत असतात. त्यांचं विधान हे राजकीय स्वार्थासाठी आहे. आता तर निर्लज्जपणाची हद्दच झालीय. काही विषय नसेल तर प्रत्येकवेळी राजघराण्यावर टीका केली जाते. पण लक्षात ठेवा. ज्या राजघराण्याविरोधात तुम्ही बोलत आहात, त्याच राजघराण्यामुळे आज तुमचा पक्ष उभा आहे. त्यामुळे राजघराण्याविषयी बोलताना थोडी तरी लाज बाळगा, असा खोचक टोला त्यांनी लगावला. छत्रपतींच्या घराण्याचा अनादर करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचा साताऱ्यात पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. याच मेळाव्यात राऊत यांनी संभाजी छत्रपती, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि शंभुराजे देसाई यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली होती.
तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात. त्या घराण्यातील आहात. त्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण तुम्ही ज्या पक्षात आहात, त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर आणि प्रेम नाही. हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यामुळे उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि शंभुराजे देसाई यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.