बुलडाणा : जिल्ह्यातील चांगेफळ (Buldhana Changefal village) गावातील महिलांनी काल सायंकाळी अचानक दारु विक्रीचा बाजार भरवून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलंय. गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिला एकवटल्या असल्याचं पाहायला मिळालं.
चांगेफल गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री वाढल्याने गावातील अनेक कुटुंबात वाद होतात तर सध्या शाळा बंद असल्याने लहान मुलं घरीच असतात आणि दारुड्यांचे संस्कार लहान मुलांवर पडतात, यामुळे गावातील अनेक लहान शाळकरी मुले सुद्धा दारूच्या व्यसनाधीन झालीत… यामुळे अनेकदा पोलिसात तक्रार करूनही काही फायदा होत नसल्याने गावातील महिलांनी चक्क दारु विक्रीचा बाजार भरवून अनोखे आंदोलन केलंय.
जोपर्यंत गावातील अवैध दारु विक्री बंद होत नाही तो पर्यंत गावातील सर्व महिला दारु बिनधास्तपणे विक्री करणार असल्याचे महिलांनी संगितले. चांगेफळ हे आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील गाव असून या परिसरात अनेक अवैध दारु बनविण्याचे कारखाने बिनदिक्कत सुरू असल्याचं चित्र यापूर्वीही समोर आलंय.
अनेकदा स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी थातुरमातुर कारवाई केल्याचा बनाव करतात आणि यामुळे या महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी आता सर्रास दारू विक्री करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत गावातील अवैध दारु विक्री बंद होत नाही तो पर्यंत गावातील सर्व महिला दारु विकू, असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतलाय.
(Unique agitation of women to stop illegal sale of liquor in the Buldhana Changefal village)
हे ही वाचा :
नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाखांची चोरी, पोलिसात गुन्हा