कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांवरील समस्यांचा डोंगर काही हटता हटेना अशी परिस्थिती आहे. तशीच परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातीलही शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे. चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. चंदगड तालुक्यात असलेल्या दौलत साखर कारखान्याची ऊस बिलांची 2050 रुपयांप्रमाणे होणाऱ्या रक्कमेपैकी 723 रुपये प्रमाण बिल शेतकऱ्यांना मिळाली आहेत, तर अजून काही बिले शेतकऱ्यांना मिळायची आहेत. ही बिले गेल्या 12 वर्षापासून मिळाली नाहीत.
त्यामुळे शेतकऱ्यांची कारखान्याकडून आर्थिक पिळवणूक सुरु आहे. तर दुसरीकडे सध्या काजू हंगाम सुरु असून काजू खरेदी दराकडूनही शेतकऱ्यांना परवडत नाही.
त्यामुळे चंदगडमधील ऊस काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी चंदगड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या हितासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील शेतकरी अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. जंगली जनावरे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले न मिळाल्यामुळे तर दुसरीकडे काजू उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळाला नसल्यामुळे आता येथील ऊस उत्पादकासह काजू उत्पादक शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडला आहे.
चंदगडमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 723 रुपयांप्रमाणे येणारी रक्कम ही 18.11 कोटी सध्या दौलत साखर कारखाना चालविणाऱ्या अथर्व इंटरट्रेड कंपनीने देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
मात्र कारखान्याचे तीन गळीत हंगाम झाले तरी या कंपनीकडून अजून शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची ही देणी अगोदर देण्यात यावी अशी मागणी चंदगड तालुका वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात काजू उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे चंदगड येथे विभागीय काजू बोर्डाची स्थापना करण्याची मागणीही वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
सध्या चंदगड तालुक्यात काजू प्रक्रिया युनिट्सची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे काजू विकासासाठी चंदगड तालुक्यात विभागीय काजू बोर्ड स्थापन करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी व्ही. एस. कार्वेकर, आर. पी. कांबळे, देवानंद कांबळे, रामजी कांबळे, साक्षी कांबळे, कांचन कांबळे, इम्रान मादार, एन. एस. पाटील, चंद्रकांत गावडे, पुंडलिक कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.