सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहात आक्षेपार्ह काम सुरू होते. याचे काही युवकांनी चित्रीकरण केले. समाजमाध्यमांच्या प्रतिनिधींना ते पाठवलं. पत्रकारांनी पंपगृहाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हापर्यंत तिथले काही कर्मचारी पळून गेले होते. पंपगृहात मटण शिजवण्याचे काम सुरू होते. ही पार्टी पंपगृहात कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर याप्रकरणी चौकशी करून कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील ताकारी येथे ताकारी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक एकवरील पंपगृहामध्ये धक्कादायक घटना समोर आली. शुक्रवारी भर दुपारी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रंगीत संगीत पार्टी रंगली होती. ताकारी येथील काही युवकांकडून हा प्रकार उघड करण्यात आला. प्रकरण उजेडात आल्यानंतर अधिकारी येथून गायब झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मात्र, पंपगृहात कर्मचाऱ्यांची रंगीत पार्टी सुरू असल्याचा प्रकार स्थानिक युवकांच्या निदर्शनास आला. त्यांनी घटनेचे चित्रीकरण करून समाज माध्यमात व्हायरल केले आहेत. त्यामुळे या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबद्दल जिल्ह्यात प्रचंड नाराजी आहे. सांगली जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सध्या जोरात सुरू आहेत.
याबाबत ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी आणि यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ते म्हणाले, घडलेला प्रकार चुकीचा आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येईल. संबंधितांवर कारवाईसाठी लेखी पत्र देणार असल्याचे डवरी म्हणाले.
पत्रकारांनी पंपगृहाकडे धाव घेतली. यावेळी भल्या मोठ्या पातेल्यांमध्ये मटण शिजवणे सुरू होते. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता यांत्रिकी विभागातील कर्मचारी आणि काही सुरक्षारक्षक असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. मात्र सुरवातीला चित्रीकरण केल्यानंतर आणि कोणीतरी येणार आहेत. याची माहिती लागल्यानंतर अधिकारी येथून गायब प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.