अकोला : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रमध्ये घडामोडीला वेग आला आहे. इतर राज्यातून काही नेते महाराष्ट्रात येऊन आपल्या पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी ओवेसी यांनी नांदेडमधून महाराष्ट्रात एंट्री केली होती. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे नांदेडमार्गे महाराष्ट्रात एन्ट्री करायला पहात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेवर गुलाबी झेंडा फडकवणार असल्याचं चंद्रशेखर राव यांनी सभेतून जाहीर केला आहे.
महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू आहे. बाहेरच्या राज्यातील कोणी नाक खुपसू नये. याचा काही फायदा होणार नाही. हे म्हणत विखे पाटील यांनी चंद्रशेखर राव यांना टोला लगावला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नांदेडमधून महाराष्ट्रात एंट्री केली. त्यावरून विखे पाटील बोलत होते.
दुसरीकडे छगन भुजबळ म्हणतात की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हेच प्रमुख पक्ष असल्याचं म्हणतात. भुजबळ यांनी स्वप्नरंजन करण्याचं सोडून दिले पाहिजे, असं म्हणत महसूल व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळ यांना टोला लगावला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अकोल्यावरून अमरावती जाण्यासाठी विमानतळावर आले होते.
राज ठाकरे यांनी आपल्या सभेत केलेल्या भाषणानंतर खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांचे भाषण हे स्क्रिप्टेड असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. यावर विखे पाटाली यांनी संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढळले असल्याचे म्हणत, संजय राऊत यांच्या आरोपाबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. असं म्हणत माध्यमांना संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देणे टाळले.
विखे पाटील म्हणाले, सत्ता गेल्यावर त्यांना आता सावरकर दैवत वाटायला लागलं. चांगली गोष्ट आहे. ज्यांनी सत्ता मिळविण्यासाठी हिंदुत्वाशी फारकत घेतली. त्यांच्या तोंडी ह्या गोष्टी शोभत नाही. सावरकरांच्या बाबतीत त्यांना बोलायचा हक्क नाही. असंही विखे पाटील यांनी सुनावलं.