नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्हात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरूयं. यामुळे जिल्हातील धरणे ओव्हर फ्लो झाली असून अनेक नद्यांना पूर देखील आलायं. मात्र, यापावसामुळे पिकांचे मोठे नुकसान (Damage) झाले असून रस्त्यांचे देखील तीन तेरा वाजले आहेत. नंदुरबार जिल्हात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. नंदुरबार तालुक्यातील वाघशेपा येथून एक धक्कादायक (Shocking) घटना पुढे येते आहे. नंदुरबार तालुक्यातील वाघशेपा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीत शिवण नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने दोन ते तीन मृतदेह पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलायं.
पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील वाघशेप येथील शिवण नदीला मोठा पूर आला होता. पुराचे पाणी थेट स्मशानभूमीत शिरल्याने दोन ते तीन मृतदेह वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीयं. दोन ते तीन मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा दावा वाघशेप येथील ग्रामस्थांनी केलायं. गेल्या तीन ते चार दिवसांपासुन जिल्ह्यात पावसाच्या संततधार सुरू आहे. यामुळे नदीला मोठा पूर आलायं.
नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पाणीसाठा वाढल्याने पाणी शिवण नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे शिवण नदीला पूर आल्याने वाघशेपा गावाच्या स्मशानभूमीत पाणी शिरले. वाघशेपा गावाची स्मशानभुमी ही नदीला लागूनच आहे. 14 ऑगस्ट रोजी स्मशानभूमीत पाणी शिरल्याने पाण्याच्या या प्रवाहात पुरलेले अनेक मृतदेह हे बाहेर आले असुन यातील दोन ते तीन मृतदेह वाहुन गेल्याचा दावा ग्रामस्थांकडुन केल्या जात आहे. याबाबत प्रशासनाने देखील पडताळणीसाठी एक पथक घटनास्थळी पाठवल्याची माहिती मिळते आहे.