रत्नागिरी : शिंदे-फडणवीस सरकार हे औट घटकेचे सरकार आहे. तर शिंदे गटाचे विसर्जन करण्याचे काम भाजपाच करेल, अशी टीका शिवसेना सचिव विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. विधानसभेतील हम साथ साथ हैच्या मुख्यमंत्र्यांच्या उत्तराला विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हम साथ साथ है हे केवळ दाखवण्यापुरते असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. एकदा शिवसेनेशी (Shivsena) बेईमानी करून दुसऱ्या पक्षाशी जवळीक साधल्यानंतर राजीनामा देणे आवश्यक होते. उपनेते पदाचा गैरवापर होत आहे. हे लक्षात आल्यानंतर यशवंत जाधव आणि उदय सामंत यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे विनायक राऊत म्हणाले. जेजे उपनेते गद्दार झाले त्यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हकालपट्टी केली, असे ते म्हणाले.
शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असा कुठलाच प्रस्ताव नाही. मात्र या संदर्भातील अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. पक्षाशी आम्ही बांधील. त्यामुळे पक्ष घेईल ती भूमिका आम्हाला मान्य असेल, असे विनायक राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीची बैठक होत आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. निवडणूक आयोगासमोरच्या शिवसेना आणि शिंदे गटाचा आज सामना होत आहे. शिवसेनेला आपले म्हणणे मांडण्यासाठी तयारीची आवश्यकता नाही. शिवसेनेला एक घटना आहे. शिवसेनेची बाजू भक्कम आहे. काही पडझड झाली म्हणून शिंदे गटाचे वचर्स्व निर्माण झाले असे नाही. महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यांतून शिवसेनेला प्रतिज्ञापत्र लिहून दिली आहेत. हे सर्व पाहता निवडणूक आयोगाने शिवसेनेला न्याय द्यायला हवा.
2024ला आम्ही ताकद दाखवून देवू. उदय सामंत यांच्या आव्हानाला राऊतांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. आव्हान स्वीकारायला आम्ही केव्हाही तयार आहोत. उदय सामंत राष्ट्रवादीत असताना लोकसभेची निवडणूक आम्ही जिंकली होती. त्यावेळी उदय सामंत निलेश राणेंचे सारथ्य करत होते. त्यांनी आम्हाला आव्हान देवू नये. आमचा विश्वास जनतेवर आहे. आमिष दाखवून शिवसेनेत या अशी वेळ आमच्यावर आलेली नाही, असा टोला त्यांनी लगावला.
धोपेश्वर रिफायनरी संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. घरादारांवर नांगर फिरवून प्रकल्प राबवता येणार नाही. तुमचा प्रकल्प चांगला तर प्रकल्पाची बाजू समजून सांगा. जबरदस्तीने रिफायनरी राबवायची हे कट कारस्थान आहे. रिफायनरी विरोधकांची पक्ष प्रमुखांशी भेट घालवून दिली जाईल. रिफायनरीला विरोध करणारे शिवसेनेचे आमदार राजन साळवी दलाल नाही. यापूर्वी रिफायनरीसाठी माझ्यावर दबाव होता, असे ते म्हणाले.
ज्या केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार दोन वर्ष दूर राहावे लागले, ईडीच्या छापेमारीत ज्यांच्याकडून घबाड मिळाले, जी महिला आरोपी तुरंगात जाणार होती, त्याच महिला आरोपीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधून घ्यावी लागते. 130 कोटी जनतेच्या या भारत देशात ईडीच्या आरोपीकडून देशाच्या पंतप्रधानांना राखी बांधून घ्यावी लागते, यासारखा दुसरा विनोद नाही, असा टोला त्यांनी लगावला.