चंद्रपूर : जिल्ह्यातील व वरोरा तालुक्यात वर्धा नदीच्या पुराचा कहर बघायला मिळतो आहे. सोईट, बेलसनी-माजरी या गावांमधून शेकडो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवले (villagers shifted) गेले आहे. सोईट व पळसगाव येथे बिकट परिस्थिती आहे. करंजी व सोईट येथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती निवारण (State Disaster Relief) दलाच्या चमूने प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासापासून पावसाने उसंत घेतली आहे. तरीही धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. पाऊस नसताना आलेल्या या महापुराने नागरिक बेहाल झाले आहेत. वर्धा नदीकाठच्या सर्वच गावांना प्रशासनाने अति सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेलंगणात जाणारा राजुरा शहराजवळच्या (Rajura City) वर्धा नदीवरील पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आज रात्रभर पोलीस प्रशासन व नागरिक यांची परीक्षा असणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या पळसगावची स्थिती बिकट झाली आहे. वर्धा आणि शिरणा नदीच्या पाण्याने गावात हाहाकार माजविला आहे. 1994 नंतर पहिल्यांदाच ग्रामस्थांनी मोठा महापूर अनुभवला आहे. संपूर्ण गावात चार ते पाच फूट पाणी आहे. सातशे लोकसंख्येचं हे गाव रिकामे करण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दलाचे जवान कामी लागले आहेत. वर्धा नदीवरील यवतमाळ- वर्धा जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहत असल्याने नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. याचा थेट परिणाम वर्धा नदीकाठच्या सर्वच गावांना बसलाय. या सर्व नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सकाळपासून बचाव अभियान सुरू आहे. गावात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी यंत्रणा ॲक्शन मोडवर आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 1 जुलैपासून पावसाचा कहर सुरू आहे. गेल्या 10 दिवसात जिल्ह्यातील 50 महसुली मंडळांपैकी 35 मंडळात सातत्याने अतिवृष्टी होत आहे. या मंडळात एक-दोनदा नव्हे तर 4-4 वेळा अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात कापूस- सोयाबीन- तूर आणि धान ही प्रमुख पिके आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचा आकडा मोठा आहे. कापूस- सोयाबीन- तूर- धान पिकाचे 55 हजार 911 हेक्टरवर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीनंतर महसूल-कृषी आणि क्षेत्रीय यंत्रणांनी सर्वेक्षण अभियान वेगवान केले आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी भर पावसात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतशिवाराची पाहणी केली. यात सोयाबीन पिकाचे सर्वाधिक 25 टक्के नुकसान झाले आहे. त्या खालोखाल कापूस, धान आणि तूर पिकांचा समावेश आहे. यंत्रणांच्या संयुक्त पंचनाम्यात जियो टॅगिंग -फोटो आणि अचूक माहिती नोंदविणार आहेत. यातून एकही पीडित शेतकरी वंचित राहू नये असा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील सततचे पीक नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.