वाशिम: दोन चार वर्ष नव्हेतर तब्बल 50 वर्ष म्हणजे पाच दशके दुसऱ्यांच्या फाटक्या चपला शिवून त्याला आकार दिला. या काळात हजारो लोकांच्या बुटांना पॉलिश करून त्यांना चकाकी दिली. त्यातून मिळणाऱ्या पैशातून संसाराचा गाडा हाकला. पोरांना शिकवलं. शरीर पोकं झालं, हातावरच्या रेषा पुसत आल्या पण मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. मुलांच्या शिक्षणासाठी ढोर मेहनत करणाऱ्या बापाची मेहनत अखेर फळाला आली आहे. मुलगा शिकला. नुसता शिकला नाही तर थेट विक्रीकर निरीक्षक झालाय. मोठ्ठा सायब झालाय. त्यामुळे राबराब राबणाऱ्या हाताचं चीज झालंय.
वाशीम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता बुट पॉलीश करण्याच्या आपल्या पारंपारिक व्यवसायातून रामभाऊ खंदारे आपला चरितार्थ चालवतात. त्यांच्या मेहनतीला फळ आलं आहे. त्यांचा उच्च शिक्षित मुलगा दीपक खंदारे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली आहे. त्यामुळे आयुष्यभर आपल्या व्यवसायातुन इतरांची फाटलेली चप्पल शिवून तसेच बुट पॉलिश करणाऱ्या बापाच्या स्वप्नाला दीपकच्या विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाल्याने झळाळी मिळाली आहे.
दीपकचे वडील रामभाऊ खंदारे यांचेकडे शेती नाही. दारिद्रय रेषेखालील जीवन जगत असतांना बुट पॉलिश करून ते कुटूंबाचा आजही चरितार्थ चालवतात. आपण शिक्षण घेऊ शकलो नसलो तरी आपल्या मुलाला चांगले शिक्षण देऊन त्याला चांगल्या नोकरीतील पदावर बसलेले बघणे हे त्यांचे स्वप्न होते.
दीपकने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक या पदावर जाऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. दिपकची आई तुळसाबाई या देखील घरातील काम सांभाळून तेलाच्या घाण्यात काम करुन संसाराला हातभार लावत आहेत.
आपण जरी शिकलो नसलो तरी मात्र आपल्या मुलांनी शिकावं, शासकीय नोकरी करावी हे स्वप्न उराशी बाळगून आपला मुलगा दीपक याच्या उज्ज्वल भविष्यासाठी रामभाऊ अहोरात्र मेहनत करत होते. आज मुलाच्या उत्तुंग भरारीमुळे दीपकसह त्याच्या आई वडिलांवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तू फक्त शिक, तुला काहीच कमी पडू देणार नाही, असं दीपकचे आईवडील त्याला वारंवार सांगायचे. त्याला उमेद द्यायचे. आईवडिलांच्या या दोन शब्दामुळे दीपकला बळ यायचं. आज त्या शब्दांचं सोनं झालं. त्यांनी आईवडिलांचा शब्द आणि मेहनत सार्थकी लावली. त्यामुळे गावकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.