महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जागा वाटपाआधीच अजितदादा यांचं सूचक विधान; गणितही मांडलं

| Updated on: May 21, 2023 | 9:13 AM

राजकारण हवेवर करून चालत नाही. कोणतीच लाट फार काळ टिकून राहत नाही. तुम्ही पक्षाची ताकत वाढवा, जिल्हा परिषद, पंचायत समितीत जागा कशा वाढवून द्यायच्या ते मी बघतो. त्यात मी वस्ताद आहे, असं अजित पवार म्हणाले.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जागा वाटपाआधीच अजितदादा यांचं सूचक विधान; गणितही मांडलं
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर : महाविकास आघाडीचा आपण घटक पक्ष आहोत. आघाडी मजबूत ठेवायची आहे. पण ते करत असताना तुमची ताकद जास्त असेल तरच तुम्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिलं जाईल. या आधी प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा अधिक असायच्या. त्यावेळी जागा वाटप करताना आम्हाला लहान भाऊ म्हणून कमी भूमिका घ्यावी लागायची. आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण ते 44 आहेत. आम्ही 54 आहोत. उद्धव ठाकरेंची शिवसेना 56 होती. हे गणित आहे, असं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचा जागेवाटपाचा फॉर्म्युला अजून ठरायचा आहे. त्या आधीच अजित पवार यांनी आम्हीच मोठे भाऊ असल्याचं सांगत ठाकरे गट आणि काँग्रेसला सूचक इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे.

कोल्हापुरातील एका मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीवरून भाजपवर जोरदार टीकाही केली आहे. कर्नाटक निवडणुकीत जनता दल सेक्युलरची मतं घटली. भाजपची मते तेवढीच आहेत. त्यात काही कमी झाली असेल. पण जेडीएसची मते दहा टक्क्याने घटली. ही मते काँग्रेसला मिळाली म्हणून काँग्रेसच्या जागा वाढल्या. त्यावर आम्ही बोलतो. त्यावर आमच्यावर टीका होते. तिकडं मुल झालं बारसं इथे करत आहेत, अशी टीका आमच्यावर होते. अरे उदाहरण द्यायला काय जातं? आम्ही बारसं घालत नाही. कोण म्हणतं पोपट मेला. पोपट मरू दे नाही तर उडून जाऊ दे आम्हाला काय घेणं देणं. बेरोजगारीचं बोला, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मक्तेदारी कुणाचीच नसते

कोणत्याही मतदारसंघात कोणाची मक्तेदारी नसते. तुम्ही तुमची ताकद वाढवली पाहिजे. तुमच्याकडे शरद पवार यांच्या सारखा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा नेता आहे. त्यांना संपूर्ण देशातील नेते मानतात. त्यामुळे आपण आपली ताकद वाढवली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

अंग झटकून काम करा

महापुरुषांच्या विचारावर राष्ट्रवादीची वाटचाल सुरु आहे. शरद पवार यांना कोल्हापूर जिल्ह्याने नेहमीच प्रेम दिलंय. कोल्हापुरात आपण पाहिजे तसं यश मिळवू शकलो नाही. आपण आत्मपरीक्षण केल पाहिजे. दोन खासदार आणि निम्मे आमदार असलेल्या जिल्ह्यात. आता फक्त 2 आमदार आहेत. राष्ट्रवादीला कोल्हापूरच पालकमंत्रीपद मिळालं नाही ही कार्यकर्त्यांची खंत आहे. नेते आल्यानंतर बुके द्यायचा, शाल घालायचे याने पक्ष वाढत नाही. त्यासाठी सामान्य लोकांपर्यंत पोहचावं लागतं. साहेबांवर, पक्षावर प्रेम असेल तर इथून पुढे अंग झटकून काम केलं पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या.

तरुणांना संधी द्या

वन बूथ, ट्वेंटी युथ ही संकल्पना आता आता राबवली पाहिजे. फ्लेक्स लावून, कटाऊट लावून पक्ष वाढत नाही. राजकारणात येऊ इच्छित असणाऱ्या युवकांना आता चांगली संधी आहे. युवक राष्ट्रवादीची जबाबदारी 22 ते 28 वर्षाच्या कार्यकर्त्यांनाच द्या. आता वेगवेगळ्या निवडणुका लागणार आहेत, असंही ते म्हणाले.