मुंबई: गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत एकूण 26 नक्षलवादी मारले गेले. त्यात सर्वात जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेही मारला गेला आहे. मिलिंद तेलतुंबडेवर 50 लाखाचं बक्षीस होतं. इतर नक्षलग्रस्त राज्यांमध्येही त्याच्यावर बक्षीस होतं. पोलिसांना तो हवा होता. कालच्या कारवाईत अखेर तो मारला गेला. भूमिहीन शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेला मिलिंद उच्च शिक्षित होता. त्याने काही काळ कार्पोरेट कंपनीत नोकरीही केली. मात्र, नंतर नक्षली विचारांनी प्रभावित होऊन नक्षलवादाकडे वळला. समाजसेवा करायला जातोय सांगून तो घरातून बाहेर पडला तो परत आलाच नाही. आली ती त्याच्या मृत्यूची बातमी.
मिलिंद तेलतुंबडेला पोलिसांनी ठार केल्याची माहिती आल्यानंतर आमची टीम थेट यवतमाळमध्ये मिलिंद तेलतुंबडेच्या गावी गेली. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील राजूरा ईजरा हे त्याचं मूळगाव. तेलतुंबडेंचा पुतण्या अॅड. विप्लव तेलतुंबडेशी आमच्या टीमने संवाद साधला. यावेळी मिलिंदविषयी बरीच माहिती हाती आली. मिलिंद हा भूमिहीन शेतकरी कुटुंबात जन्माला आला होता. उच्च शिक्षणानंतर तो डब्ल्यूसीएलमध्ये नोकरीला लागला. या ठिकाणी त्याने आयटक युनियनचे जाळे पसरविले. बराच काळ तो बाहेरच होता. 1996मध्ये तो शेवटचा कुटुंबाला भेटायला आला होता. मी लोकांच्या सेवेसाठी जातोय असं सांगून तो निघून गेला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही, असं विप्लव यांनी सांगितलं.
मिलिंदला पाच भाऊ आणि तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. मिलिंद, किशोर, प्रवीण, विलास आणि आनंद हे भाऊ एकत्रित राहत होते. मिलिंदचं संपूर्ण कुटुंब उच्च शिक्षित आहे. मिलिंदचं इयत्ता सातवीपर्यंतच शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण वणी येथील महाविद्यालयात झालं. युनियनमध्ये काम करत असतानाच त्याचा संबंध नक्षली चळवळीत काम करणाऱ्या लोकांशी आला. तो चळवळीत शिरला. वणीसह राज्यात नक्षलवादी चळवळ वाढवण्यासाठी त्याने काम केलं. मात्र, त्यात त्याला फारसं यश आलं नाही. मिलिंद हा दंडकारण्यातील सर्वात मोठा नक्षलवादी होता. गेल्या 30 वर्षापासून तो फरार होता.
नक्षलवाद्यांनी 2014 मध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल केले होते. त्यावेळी महाराष्ट्राची जबाबदार सांभाळणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेला केंद्रीय समितीत स्थान देण्यात आलं होतं. ही नक्षलवाद्यांची सर्वोच्च समिती मानली जाते. त्यावेळी केंद्रीय समितीत पहिल्यांदाच दलित समाजाला प्रतिनिधित्व देऊन नक्षलवाद्यांच्या भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले होते. महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम पाहणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेवर उत्तर गडचिरोली, गोंदिया आणि बालाघाट या विभागाचीही जबाबदारी होती.
26 naxals were killed in an encounter with the C-60 unit of Maharashtra Police in the jungles of Gyarapatti in Gadchiroli district yesterday.
Latest visuals from the site of encounter at Maharashtra-Chhattisgarh border. pic.twitter.com/AndJYQvMqF
— ANI (@ANI) November 14, 2021
मिलिंद तेलतुंबडेची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ राही उर्फ इश्कारा उर्फ सविता उर्फ कविता ही बीएस्सी (मायक्रोबायॉलॉजी), एम्एस्सी (झुऑलॉजी), एम्ए (सोशॉलॉजी) आणि बीएड अशा शैक्षणिक पदव्या घेतल्या आहेत. त्या मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होत्या. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, माडिया, गोंडी भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. तिच्यावर पोलिसांच्या खुनासाहित अनेक आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.
संबंधित बातम्या:
naxal encounter: गडचिरोलीत नेमकं काय घडलं?; एकनाथ शिंदे म्हणाले, 10 तास सुरू होती चकमक
गडचिरोली पोलिसांची नक्षलविरोधी मोठी कारवाई, चकमकीत मारला गेल्याची चर्चा असलेला मिलिंद तेलतुंबडे कोण?