अन् ‘मराठी श्रीवल्लीकार’, विजयच्या गालावर आनंदाची कळी खुलली; यशोमती ठाकूर यांच्याकडून प्रोफेशनल कॅमेराची भेट…

| Updated on: Feb 22, 2022 | 7:09 PM

मराठी ‘श्रीवल्ली’गाण्याचा निर्माता युट्युबर विजय खंडारे (Vijay Khandare) व्हिडिओ शूट करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नुकतीच त्याला प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेरा भेट देऊन त्याचा गौरव केला आहे.

अन् ‘मराठी श्रीवल्लीकार’, विजयच्या गालावर आनंदाची कळी खुलली; यशोमती ठाकूर यांच्याकडून प्रोफेशनल कॅमेराची भेट...
यशोमती ठाकूर विजय खंदारे
Image Credit source: यशोमती ठाकूर फेसबूक
Follow us on

अमरावती: “तुझी झलक वेगळी श्री वल्ली, काळजात तू भरली”अशा मराठी ‘श्रीवल्ली’गाण्याचा निर्माता युट्युबर विजय खंडारे (Vijay Khandare) व्हिडिओ शूट करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नुकतीच त्याला प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेरा भेट देऊन त्याचा गौरव केला आहे. “तुझी झलक वेगळी श्री वल्ली, काळजात तू भरली” हे गाणं अमरावतीच्या (Amaravati) तिवसा तालुक्यातील विजय खंडारे या तरुणाने बनविले आहे. बीएससीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेला विजय अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला. लहानपणी भाजी विक्रीपासून हमालीपर्यंतची कामे त्याने केली आहेत. मात्र, टिक टॉक अॅपपासून आपल्या सोशल प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आणि अस्सल वऱ्हाडी बोली भाषेतील मनोरंजक व्हिडिओ व ब्लॉग द्वारे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. टिक टॉक बंद झाल्यानंतर विजय युट्यूबकडे वळला व अल्पावधीतच त्याला लोकप्रियता मिळत गेली. यशोमती ठाकूर यांनी गिफ्ट दिल्यानं विजय खंडारे यानं आनंद व्यक्त केलाय.

सुपरहिट ‘श्रीवल्ली’चं मराठी मेकिंग आणि विजय प्रसिद्धीच्या शिखरावर

सुपरहिट ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या मराठी आवृत्तीने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचविले. याची दखल घेत मंत्री यशोमती. ठाकूर यांनी विजय खंडारेसह त्यांचे कुटुंबीय आणि टीमचा गौरव केला होता. यावेळी अनपेक्षित भेटवस्तू देण्याचे त्याला सांगितले होते. त्यानुसार मंत्री ठाकूर यांनी विजयकडे प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेरा दिला.

…तर असे होतकरू विजय निर्माण होतील

आपल्या आसपास अनेक युवा अतिशय मेहनत घेऊन अभिनव पद्धतीने काम करीत आहेत. त्यांच्यातील गुणवत्ता ओळखू त्यांना प्रोत्साहान दिले तर ते अधिक चांगल्यारीतीने व गतीने काम करतील, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. विजयसारखे अनेक युवा निर्माण होतील, पर्यायाने आपले, आपल्या गावाचे, समाजाचे नाव रोशन करतील. याच भावनेतून विजयला त्याच्या कामात मदत करणारी वस्तू देण्याची माझी इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली याचा मला आनंद आहे, अशा भावना यशोमती ठाकूर यांनी व्यक्त आहे.

विजयच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उर भरुन आला

विजय, तर माझ्या जिल्ह्यातला होतकरू, हुशार आणि कष्टाळू तरुण युट्यूबर आहे. त्यामुळे त्याचे कौतुक करणे हे क्रमप्राप्त ठरते. बीएससीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेतरी अतिशय बिकट परिस्थितीशी दोन हात करीत विजय इथपर्यंत पोहचला आहे. त्याने निवडलेला मार्ग चांगला आहे. तो अतिशय दर्जेदार कंटेट निर्माण करीत आहे, मात्र तो वापरत असलेली साधनसामुग्री पुरेशी नाही. आतापर्यंत अनेक अडचणींचा सामना करूनही त्याने उत्तम चित्रफिती तयार केल्या आहेत. त्याच्या घरी भेट देऊन संवाद साधल्यानंतर या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. त्यामुळेच त्याला सध्याच्या कामात मदत होण्यासाठी प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेरा देण्याचे ठरले. त्यानुसार विजयसाठीची सप्रेम भेट, त्याच्या हातात पोहचल्यानंतर विजयाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अभिमानाने उर भरून आला. त्याच्या स्वप्नांना बळ देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, विजयाच्या चेहऱ्यावरील त्या आनंदाची मोजमाप होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

इतर बातम्या :

आता मुंबई महापालिकेतही राजकीय पक्षांना नगरसेवक संख्येच्या प्रमाणात निधी वाटप, शिवसेनेचे संकेत; भाजपचे समर्थन की विरोध?

पुण्यानंतर मुंबई मेट्रोच्या उद्घटनावरूनही कलगीतुरा? भाजप नेत्यांची मागणी काय?